नळाचे पाणी शुद्ध; चाचण्यांचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST2020-12-30T04:26:11+5:302020-12-30T04:26:11+5:30

लातूर शहरासाठी मांजरा प्रकल्पातून दररोज ४५ ते ५० एमएलडी पाणी उचलले जाते. या पाण्याचे शुद्धीकरण हरंगुळ व आर्वी येथील ...

Pure tap water; Test report | नळाचे पाणी शुद्ध; चाचण्यांचा अहवाल

नळाचे पाणी शुद्ध; चाचण्यांचा अहवाल

लातूर शहरासाठी मांजरा प्रकल्पातून दररोज ४५ ते ५० एमएलडी पाणी उचलले जाते. या पाण्याचे शुद्धीकरण हरंगुळ व आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये केले जाते. त्यानंतर प्रभागनिहाय पाण्याचे वितरण त्या-त्या जलकुंभाअंतर्गत करण्यात येते. पाणी वितरणासाठी शहरात दहा जलकुंभ आहेत. बार्शी रोड, शासकीय काॅलनी, सरस्वती काॅलनी, बसवेश्वर काॅलनी, डालडा फॅक्टरी, राजधानी, गांधी चौक, आर्वी, विवेकानंद चौक आदी जलकुंभांद्वारे वेळापत्रकानुसार पाण्याचे वितरण करण्यात येते. या जलकुंभाअंतर्गत दररोज पाच ते सहा पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. सदर पाणी पिण्यास योग्य अथवा अयोग्य, याची तपासणी केली जाते. पाण्यामध्ये जैविक घटक आहेत का, याचीही तपासणी होते. पाणी पिण्यास योग्य असल्याचा शेरा आल्यानंतरच त्याचे वितरण केले जाते, असे मनपा पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ज्या भागात पाणी सोडले जाणार आहे, त्या भागातील पाणी नमुन्यांची नियमित तपासणी केली जात असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलवले यांनी सांगितले.

जलकुंभनिहाय घेतले जातात पाण्याचे नमुने

जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाण्याचे शुद्धीकरण झाल्यानंतरही पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. जलकुंभनिहाय पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. दररोज पाच ते सहा पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. पावसाळ्यात पाण्याचे नमुने अधिक घेतले जातात. खड्ड्यात साचलेले पाणी नळाच्या पाण्यात मिसळून अशुद्ध होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात जास्त पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते, जेणेकरून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होणार नाही.

अशी हाेते तपासणी

पाण्याचा हार्डनेस तसेच कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या प्रमाणाची तपासणी केली जाते. पाण्यातील जीवाणूजन्य संसर्ग घटकांची तपासणी केली जाते. पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाणही तपासले जाते.

पाण्यातील या सर्व घटकांचे प्रमाण संतुलित आहे का, सदर पाणी पिण्यासाठी योग्य की अयोग्य, याबाबतची सर्व प्रक्रिया या तपासणीमध्ये केली जाते. त्याचा अहवाल पिण्यायोग्य आहे की नाही, हे पाहिल्यानंतरच पाण्याचे वितरण होते.

कोट

जलशुद्धीकरण केंद्रावर पाण्याचे शुद्धीकरण झाल्यानंतर त्या-त्या भागातील पाण्याचे नमुने पाणी पुरवठा विभागाच्या वतीने तपासणीसाठी घेतले जातात. शिवाय, आरोग्य विभागाच्या वतीनेही पाणी नमुन्यांची परस्पर तपासणी होते. या सर्व तपासण्यांच्या अहवालानुसार लातूरला दिले जाणारे पाणी १०० टक्के शुद्ध आहे.

- नागनाथ कलवले, कार्यकारी अभियंता, मनपा

Web Title: Pure tap water; Test report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.