तालुक्यातील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे. बायोमॅट्रिक मशीन, सीसीटीव्ही बसवावी, मागणी चाकूर संघर्ष समितीच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. त्यामुळे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी प्रत्येक कार्यालयातील प्रमुखांची बैठक घेऊन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले तसेच बायोमेट्रिक मशीन, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचेही आदेश दिले. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
चाकूर संघर्ष समितीचे सुधाकरराव लोहारे, नारायण बेजगमवार, शिवलिंग गादगे, दत्तात्रय झांबरे, सागर होळदांडगे, सूर्यकांत सूर्यवंशी, शैलेश नाकाडे, अभिजित सूर्यवंशी, अभिजित कामजलगे, सत्यम येणाले, गणेश पाटील, आकाश सूर्यवंशी, निखील येणाले, अजय धनेश्वर, अनिल महालिंगे, सिद्धांत भालेराव आदींनी सोमवारी सकाळी ९.४५ वा. येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात गेले. तिथे केवळ चालक, शिपाई, चौकीदार असे तिघे उपस्थित होते. त्यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या सुरू केला.
दरम्यान, तहसीलदारांना ही माहिती दिली. तहसीलदारांनी तलाठी एन. जी. खंदाडे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागात पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तलाठ्यांनी पंचनामा केला तेव्हा १४ पैकी तिघे उपस्थित होते. त्यात एक चालक, एक शिपाई, एक चौकीदाराचा समावेश आहे.
कार्यवाही करावी...
तालुक्यातील ९० टक्के अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. कार्यालयीन वेळेत येत नाहीत. त्यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. उशीरा येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करावे. मुख्यालयी न राहणाऱ्यांवर तहसीलदारांनी कार्यवाही करावी.
- सुधाकरराव लोहारे, चाकूर संघर्ष समिती.
प्रस्ताव सादर...
सार्वजनिक बांधकाम उपविभागात केवळ तीन कर्मचारी उपस्थित होते. तलाठ्यांनी पंचनामा केला. जे वेळेवर आले नाहीत. त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला आहे.
- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.