रिपाइंची तहसीलसमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST2021-03-27T04:20:05+5:302021-03-27T04:20:05+5:30
चाकूर : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्याचा फटका मजुरांना बसत आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने ...

रिपाइंची तहसीलसमोर निदर्शने
चाकूर : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्याचा फटका मजुरांना बसत आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने त्यांना आर्थिक मदत द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी रिपाइंच्यावतीने शुक्रवारी येथील तहसील कचेरीसमोर निदर्शने करण्यात आली.
माजी नगराध्यक्ष तथा रिपाइंचे मिलिंद महालिंगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊनमुळे मजूर, कामगार, छोट्या व्यापाऱ्यांसह अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शासन ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते, त्याचप्रमाणे मजुरांनाही आर्थिक मदत करावी. मजुरांना कर्ज वसुलीसाठी नोटीस देण्यात आल्या आहेत. मागासवर्ग महामंडळाचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, तालुकाध्यक्ष पपन कांबळे, जिल्हा संघटक लक्ष्मण तिकटे, शहराध्यक्ष नितीन डांगे, विक्की महालिंगे, ज्ञानोबा महालिंगे, चेतन महालिंगे, दयानंद वाघमारे, अब्बास शेख आदी सहभागी झाले होते.