लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना बारा वर्षांनंतर देय असलेली वरिष्ठ वेतनश्रेणी व २४ वर्षांनंतर देय असलेल्या निवडश्रेणीचे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत. या संदर्भातील काही प्रस्तावांमध्ये त्रुटी असून, हे प्रस्ताव तत्काळ निकाली काढावेत, अशी मागणी शिक्षक संसदेच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्राथमिक पदवीधर शिक्षकांना इतर जिल्ह्यांत पदवीधरमधून मुख्याध्यापक झालेल्यांनाही काल्पनिक वेतनवाढ देण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर प्राथमिक पदवीधरमधून मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती झालेल्या शिक्षकांना एक काल्पनिक वेतनवाढ देण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाला मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी त्रुटींची पूर्तता होताच आदेश निर्गमित केले जातील, असे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण समितीचे स्वीकृत सदस्य तथा शिक्षक संसदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश सुवर्णकार, शिक्षक समितीचे राज्य संपर्कप्रमुख शिवाजीराव साखरे, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण पांचाळ, लक्ष्मण दावणकर, शेख, चव्हाण, मारुती सूर्यवंशी, राम साखरे, आदी उपस्थित होते.