महावितरणच्या उपविभाग निर्मितीचा प्रस्ताव धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST2021-06-19T04:14:31+5:302021-06-19T04:14:31+5:30
जळकोट तालुका असूनही तालुक्याच्या ठिकाणी महावितरणचे उप विभागीय कार्यालय नसल्याने हा सुविधा नसलेला राज्यातील एकमेव तालुका ...

महावितरणच्या उपविभाग निर्मितीचा प्रस्ताव धूळखात
जळकोट तालुका असूनही तालुक्याच्या ठिकाणी महावितरणचे उप विभागीय कार्यालय नसल्याने हा सुविधा नसलेला राज्यातील एकमेव तालुका ठरत असल्याची ओरड वाढली आहे. प्रत्येक तालुक्यासाठी महावितरणचे उपविभागीय कार्यालय आहे मग जळकोट तालुक्यानेच काय घोडे मारले असा प्रश्न उपस्थित होत आहे. लातूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरचा तालुका आहे. त्यामुळे सर्व बाबतींत शासन व प्रशासनाकडून या तालुक्याकडे दुर्लक्ष होत आहे. असुविधांबद्दल कोणीच दखल घेण्यास तयार नाही. तालुका निर्मितीनंतर सर्व विभागांची कार्यालये तालुका मुख्यालयी स्थापन करणे क्रमप्राप्त ठरते. पण हा तालुका मात्र त्याला अपवाद ठरत आहे. येथे महावितरणचे उप विभागीय कार्यालय नसल्याने तालुक्यातील वीज ग्राहकांना शिरुर ताजबंद व उदगीर येथे चकरा माराव्या लागत आहेत. तालुका एक असला तरी कारभार मात्र तीन तालुक्यांतून चालत असल्याने विचित्र स्वरूपाच्या अडचणींचा मुकाबला जळकोट तालुक्यातील वीज ग्राहकांना करावा लागत आहे. २२ वर्षे लोटूनही हे कार्यालय होत नसल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे. नेतेमंडळींना निवडणुकीत या तालुक्याची आठवण येते, पण तालुक्यातील तब्बल एक लाख लोक दोन दशकांपासून गैरसोयींनी हैराण आहेत याची जाणीव का म्हणून होत नाही असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. तालुक्यातील जनता सर्व संबंधितांची ही नकारात्मक भूमिका कधी संपेल याकडे डोळे लावून बसली आहे.
विकासासाठी उदासीनता...
जळकोट तालुक्याची निर्मिती २२ वर्षांपूर्वी झाली असली तरी अद्यापही अनेक कार्यालये शहरात झालेली नाहीत. त्यामुळे येथील तालुक्यातील नागरिकांना विविध कामांसाठी तीन तालुक्यांशी संपर्क ठेवावा लागत आहे. प्रशासनाने तत्काळ सुविधा पुरवून तालुक्याच्या ठिकाणी असणारी सर्व कार्यालये सुरू करावीत, अशी मागणी होत आहे.