पदोन्नती रखडल्या, लातूर आरटीओ कार्यालयात दोन वर्षांपासून प्रभारीराज !

By आशपाक पठाण | Published: March 23, 2024 06:16 PM2024-03-23T18:16:17+5:302024-03-23T18:16:26+5:30

पदोन्नती रखडली : उदगीरची भर पडल्याने वाढणार कामाचा ताण

Promotion stalled, Latur RTO office in charge for two years! | पदोन्नती रखडल्या, लातूर आरटीओ कार्यालयात दोन वर्षांपासून प्रभारीराज !

पदोन्नती रखडल्या, लातूर आरटीओ कार्यालयात दोन वर्षांपासून प्रभारीराज !

लातूर : परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची पदोन्नती, बदलीची प्रक्रिया मागील अनेक दिवसांपासून रखडली आहे. राज्यभरात बहुतांश कार्यालयांचा कारभार प्रभारींवरच सुरू आहे. लातूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच जवळपास सव्वा दोन वर्षांपासून प्रभारीराज सुरू आहे. धाराशिवचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्याकडे १ नोव्हेंबर २०२१ पासून प्रभारी कारभार आहे. अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडल्याने कामाचा ताणही वाढला आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय असलेल्या लातूरला मागील २७ महिन्यांपासून पूर्णवेळ कारभारी मिळेना झाला आहे. तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्यांचीही जागा रिक्तच आहे. शासनाकडून आरटीओ, डेप्युटी आरटीओंची जागा भरण्यात उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. लातूर अंतर्गत धाराशिव, अंबाजोगाई, उमरगा चेक पोस्टचा कारभार केला जातो. मुख्यालयी अधिकाऱ्यांची जागा दोन वर्षे उलटली तरी भरली जात नसल्याने ओरड वाढली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या झाल्यावर रिक्त ठिकाणी पूर्ण आरटीओ मिळतील, असे सांगण्यात येत आहे.

लातूर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाची स्थापना झाल्यानंतर ८ ऑगस्ट २००८ रोजी ए.जी. पाठक आरटीओ म्हणून रूजू झाले ते १० नोव्हेंबर २०११ पर्यंत लातूरला कार्यरत होते. त्यानंतर ११ नोव्हेंबर २०११ रोजी एस.डी. आटोळे हे लातूरला आले, त्यांनी जवळपास सात महिने काम केल्यावर १ जून २०१२ मध्ये त्यांची बदली झाली. ११ जून २०१२ रोजी डॉ. डी.टी. पवार यांनी आरटीओ म्हणून पदभार घेतला. ३१ ऑगस्ट २०१५ रोजी त्यांची बदली झाल्यावर ७ सप्टेंबर २०१५ रोजी पी.जी. भालेराव आले. जवळपास अडीच वर्षे लातूर येथे पूर्ण झाल्यावर ३० जून २०१७ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर काही दिवस तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला. जवळपास दोन महिन्यांनंतर ५ सप्टेंबर २०१७ रोजी अमर पाटील रूजू झाले. ३१ ऑक्टोबर २०२१ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर मात्र लातूरला पूर्णवेळ प्रादेशिक परिवहन अधिकारी मिळाले नाहीत. १ नोव्हेंबर २०२१ पासून आजतागायत धाराशिवचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. जर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांच्यावर ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या कारवाईनंतर त्यांचीही जागा रिक्तच झाली आहे.

उदगीरही चालणार प्रभारींवरच...
आचारसंहितेपूर्वी राज्य शासनाने उदगीरला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर केले आहे. हे कार्यालय तत्काळ सुरू करण्याचे आदेशित करण्यात आल्यामुळे सध्या जागा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. लागलीच या ठिकाणी काही अधिकारी व कर्मचारीही नियुक्त करावे लागणार आहेत. धाराशिव, लातूर आणि आता उदगीरचे खेटे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना मारावे लागत आहेत. उदगीरला प्रभारी अधिकारीच नियुक्त करावा लागणार आहे.

Web Title: Promotion stalled, Latur RTO office in charge for two years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.