श्री केशवराज विद्यालयात कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:21 IST2021-03-09T04:21:58+5:302021-03-09T04:21:58+5:30
शाहू महाविद्यालयात संगीत समारोह लातूर : राजर्षी शाहू महाविद्यालयातील संगीत विभागाच्या वतीने ‘शाहू संगीत समारोह’ शर्वरी डोंगरे या बालगायीकेच्या ...

श्री केशवराज विद्यालयात कार्यक्रम
शाहू महाविद्यालयात संगीत समारोह
लातूर : राजर्षी शाहू महाविद्यालयातील संगीत विभागाच्या वतीने ‘शाहू संगीत समारोह’ शर्वरी डोंगरे या बालगायीकेच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय व सुगम गायनाने पार पडला. शर्वरी डोंगरे हिला प्रा. शशिकांत देशमुख, तबला संगती प्रा. हरिउत्तम जोशी, तानपुरा संगती सायली टाक यांनी केली. कार्यक्रमास डॉ. अभिजीत यादव, प्रा. राहुल आठवले, प्रा. नितीन पांचाळ, प्रा. माधव शेळके, प्रा. महेश कुंभार, प्रा. वैभव माने, प्रा.डॉ. पल्लवी पाटील यांची उपस्थिती होती.
शहरातील रस्त्यांवर बांधकामाचे साहित्य
लातूर : शहरातील काही प्रभागातील मुख्य रस्त्यावर बांधकामाचे साहित्य टाकले जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर लोखंडी सळई, वाळू, खडी टाकली असल्याने चारचाकी वाहनांनाही अडथळा येत आहे. याकडे शहर महापालिकेच्या पथकाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, अनेकांना सांगूनही बांधकाम साहित्य दिले नसल्याचे शहरातील चित्र आहे.
शहरात दररोज २५ टन टरबुजाची आवक
लातूर : शहरात दररोज २५ ते ३० टन टरबूजाची आवक होत आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने रसाळ फळांना नागरिकांची मागणी वाढली आहे. गंजगोलाई, दयानंद गेट परिसर, औसा रोड, रेणापूर नाका, बार्शी रोड आदी भागांत अनेक ठिकाणी टरबुजाच्या विक्रीसाठी स्टॉल लागले आहेत. गेल्या आठवडाभरापासून रसाळ फळांना मागणी वाढली असल्याचे फळ विक्रेत्यांनी सांगितले.
पाणी टंचाई निवारणासाठी कृती आराखडा
लातूर : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने संभाव्य पाणी टंचाई निवारणासाठी ११ कोटी ७९ लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत विहीर खोलीकरण, नवीन विंधन विहीर घेणे, टँकरने पाणी पुरवठा करणे, बोअरवेल, विहिरींचे अधिग्रहण करणे, बुडक्या घेणे आदी कामे केली जाणार आहेत. ज्या गावांत टंचाई आहे, त्यांना पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे. सध्या एकही प्रस्ताव दाखल नसल्याचे टंचाई निवारण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
रस्त्यावरील कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त
लातूर : शहरातील जुनी रेल्वे लाईन रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावरील रयतु बाजार परिसरात तर सायंक़ाळी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. त्यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शहर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
हरंगुळ नवीन वसाहत रस्त्याची दुरवस्था
लातूर : शहरापासून नजिक असलेल्या हरंगुळ वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. पावसामुळे रस्ता खचला आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. अवजड वाहनांची रेलचेल असल्याने रस्त्यावर धुराळा उडत आहे. तात्काळ दुरुस्तीची मागणी होत आहे.
आरटीई प्रवेशासाठी फॉर्म भरण्यास वेग
लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. जिल्ह्यात १७४० जागा असून, २१ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सध्या अर्ज भरण्यास वेग आला असून, यंदा राज्यस्तरावर एकच सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सुविधांचा अभाव
लातूर : शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सुविधांचा अभाव आहे. पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसून, शौचालयाची नियमित स्वच्छता होत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. लातूरहून इतर जिल्ह्यांत दररोज शेकडो बसेस जातात. त्यामुळे हजारो प्रवाशांची रेलचेल असते. याकडे एसटी महामंडळ प्रशासनाने लक्ष देऊन सुविधा पुरविण्याची मागणी पवाशांमधून होत आहे.
लातूर शहरातून मोबाईलची चोरी
लातूर : रुमचा दरवाजा उघडा ठेवून मोबाईल चार्जिंगला लावून झोपी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून मोबाईल चोरी केल्याची घटना लातूर शहरात घडली. या प्रकरणी शिवाजय जनार्दन उबाळे याच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. चौगुले करीत आहेत. दरम्यान, लातूर शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीसह मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे.
खाडगाव परिसरातून चारचाकी वाहनाची चोरी
लातूर : शहरातील खाडगाव येथे पार्किंग केलेले मालवाहतूक चारचाकी वाहन (क्र.एमएच २४ एबी ६३०४) अज्ञात चोरट्यांनी २ मार्च रोजी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी फिर्यादी दादासाहेब सोपानराव मस्के (३७, रा. खाडगाव) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. बिराजदार करीत आहेत.
शिवीगाळ करून दगडाने मारहाण
लातूर : शेतातील नाली खोदताना पाईप तुटला म्हणून कुरापत काढून शिवीगाळ व धक्काबुक्की करून दगडाने मारहाण करून कपाळ फोडल्याची घटना जळकोट तालुक्यातील डोमगाव येथे घडली. या प्रकरणी फिर्यादी सुभाष व्यंकटराव पवार (५०, रा. डोमगाव) यांच्या तक्रारीवरून प्रदीप राम पवार यांच्याविरुद्ध जळकोट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. शेळके करीत आहेत.