लातूर : जिल्ह्यात सहा ते सात हजार परवानाधारक रिक्षाचालकांची संख्या असून, बहुतांश रिक्षाचालकांनी शासनाने केलेल्या मदतीच्या घोषणेचे स्वागत केले आहे. भाड्याने रिक्षा चालविणाऱ्या चालकांनाही या मदतीचा लाभ द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने १४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे रिक्षाची प्रवासी वाहतूक बंद राहणार आहे. शासनाकडून फक्त परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. परंतु, भाड्याने रिक्षा चालविणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. ज्यांची रिक्षा नाही, परंतु रिक्षा चालवितात त्यांचे काय, असा प्रश्न काही चालकांनी उपस्थित केला आहे. दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा सरकारने लाॅकडाऊनच्या काळात पाच हजार रुपयांची मदत देऊ केली. त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही पाच हजारांची मदत द्यायला हवी होती, अशी अपेक्षाही काही रिक्षाचालकांनी व्यक्त केली. रिक्षा चालविण्याचा परवाना आहे; बॅज आहे, परंतु, रिक्षा नाही, अशा चालकांनाही दीड हजाराच्या मदतीत घ्यावे, अशी मागणी आहे. परंतु, याबाबतचा काय निर्णय आहे, ते शासन आदेशानंतरच कळणार असले तरी घोषणेचे चालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
परवानाधारक अनेक रिक्षाचालक भाड्याने रिक्षा देतात. अशा रिक्षाचालकांनाही या योजनेत मदत द्यायला हवी. जाहीर झालेली मदत कमी आहे. दिल्ली, कर्नाटक आणि तेलंगणा सरकारांच्या धर्तीवर पाच हजार रुपये मदत द्यायला हवी होती. अनेकांनी कर्जावर रिक्षा घेतलेल्या आहेत. त्यांचे हप्ते फेडणे मुश्किल आहे.
- त्रिंबक स्वामी
शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना जाहीर केलेली मदत समाधानकारक आहे. पूर्वी रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी योजना जाहीर केली होती. परंतु, त्याबाबत कोणतीच मदत किंवा सरकारी योजनांचा लाभ रिक्षाचालकांना मिळाला नाही. आता जाहीर केलेल्या मदतीचे पैसे सुलभ पद्धतीने मिळावेत.
- मच्छिंद्र कांबळे