आधीचे २२ टक्के टार्गेट पूर्ण; आता अठरा वर्षांपुढील आठ लाख जणांना मिळणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:50+5:302021-04-21T04:19:50+5:30
लातूर : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला असून, २२.७५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. पहिला व दुसरा ...

आधीचे २२ टक्के टार्गेट पूर्ण; आता अठरा वर्षांपुढील आठ लाख जणांना मिळणार लस
लातूर : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला असून, २२.७५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. पहिला व दुसरा मिळून जवळपास २ लाख १०१ डोस दिले असून, १ लाख ८२ हजार ३९ जणांनी आतापर्यंत लस घेतली आहे. दरम्यान, १ मेपासून १८ ते ४५ वयोगटांतील जवळपास साडेआठ लाख नागरिक लसीकरणाला पात्र आहेत.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, खासगी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय व मनपाचे दवाखाने अशा एकूण १७१ केंद्रांवर लसीकरणाची मोहीम सुरू आहे. ४५ वर्षांपुढील सर्व व्यक्तींना लस दिली जात आहे. प्रारंभीच्या काळात आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाइन कर्मचारी, ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेले नागरिक आणि ज्येष्ठांना लस दिली जात होती. सद्य:स्थितीत ४५ वर्षांपुढील सर्वच नागरिकांना लस दिली जात आहे. त्यानुसार जिल्ह्यात १ लाख ८२ हजार ३९ जणांनी पहिला डोस घेतला असून, १८ हजार ९६२ जणांनी पहिला डोस घेऊन दुसरा डोस घेतला आहे. २२.७५ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मध्यंतरी लसीचा तुटवडा होता. आता वेग येणार आहे.
आठवड्याचा साठा; १५ हजार डोस उपलब्ध
सध्या जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे १४ ते १५ हजार लसीचे डोस उपलब्ध आहेत. सध्याची क्षमता पाहता आठवडाभर ही लस पुरणार आहे. उद्यापर्यंत १२ हजार लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आठवडाभर पूर्ण क्षमतेने ही लस पुरणार आहे.
दोन दिवसांपासून लसीचा पुरवठा सुरळीत झाल्यामुळे आता लसीकरणाला वेग येत आहे. १ मेनंतर यात अधिक लस उपलब्ध होऊन मोहीम जोरात राबविली जाणार असून, प्रस्तुत वयोगटात शंभर टक्के लसीकरण करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाचा राहणार आहे.
४५ च्या पुढील वयोगटात ८.५ लाख पात्र
४५ पेक्षा पुढील वयोगटामध्ये जिल्ह्यात लसीकरणासाठी ८ लाख ५१ हजार नागरिक पात्र आहेत. त्यापैकी १ लाख ८२ हजार ३९ जणांनी लस घेतली आहे. यात ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. २ लाख १०१ डोस दिले आहेत. त्यात दुसरा डोस घेणाऱ्या व्यक्तींची संख्या १८ हजार ९६२ वर आहे.