किनगाव (जि. लातूर ) : हुंड्यासाठी करण्यात आलेल्या मारहाणीत एका २१ वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील विजयनगर तांडा-खंडाळी येथे १७ एप्रिल २०२१ राेजी घडली. दरम्यान, याप्रकरणी संजय माेहन राठाेड यांनी अहमदपूर न्यायालयात धाव घेत दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानुसार किनगाव पाेलीस ठाण्यात साेमवारी आठजणांविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने अहमदपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पाेलिसांनी सांगितले, परभणी जिल्ह्यातील पिराचा तांडा - माेजमाबाद (ता. पालम) येथील काेमल (२१) हिचा विवाह अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील विजयनगर तांडा येथील सुनील गाेविंद जाधव (२५) याच्याशी २०२०मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नामध्ये लग्न खर्च म्हणून ३ लाख ५० हजार रुपये, दाेन ताेळे साेन्याचे दागिने, संसाराेपयाेगी साहित्य देण्यात आले हाेते. काही दिवस काेमलला सुखाने नांदविण्यात आले. मात्र, नंतर तुझ्या माहेरहून हुंडा कमी मिळाला आहे. दुकान टाकण्यासाठी आणखी ५० हजार रुपये घेऊन ये, म्हणून तिचा सतत शारीरिक, मानसिक छळ सुरु केला. तिला वारंवार शिवीगाळ करुन मारहाण करण्यात येत हाेती. दरम्यान, ती गर्भवती असताना तिला धमक्या देत छळ सुुरुच हाेता. पैशांच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या मारहाणीत गर्भवती काेमलचा मृत्यू झाला. ही घटना १७ एप्रिल २०२१ राेजी घडली. तर विवाहितेच्या माहेरच्या मंडळींना घरी जावून तुम्ही कुठे तक्रार केली तर तुम्हालाही ठार मारु, अशी धमकी देण्यात आली. याबाबत विवाहितेच्या माहेरच्यांनी अहमदपूर न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत कलम १५६ (३) सीआरपीसीप्रमाणे गुन्हा नाेंद करण्याबाबत आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार संजय माेहन राठाेड (४२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी सुनील गोविंद जाधव, गोविंद शिवलाला जाधव, सखुबाई गोविंद जाधव, पारूबाई उत्तम जाधव, शिवाजी तुळशीराम जाधव, सुभाष तुळशीराम जाधव, शानुबाई सुभाष जाधव (सर्व रा. विजयनगर तांडा-खंडाळी) तर अनिल रुस्तम राठोड, शाहूबाई अनिल राठोड (दोघे रा. पिराचा तांडा, मोजमाबाद, ता. पालम, जि. परभणी) यांच्याविरुद्ध गुरनं. २३३ / २०२१ कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पाेलीस निरीक्षक एस. जी. बंकवाड करत आहेत.
अहमदपूर तालुक्यातील विजय नगर तांडा खंडाळी (ता. अहमदपूर) येथील विवाहितेला संगनमत करून हुंड्यासाठी जाच जुलूम करून मुलीला व पोटातील बाळाला जीवे मारल्याची घटना १७ एप्रिल २०२१ रोजी विजयनगर तांडा खंडाळी येथे घडली. फिर्यादी संजय मोहन राठोड यांनी न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय, अहमदपूर यांच्याकडे किरकोळ अर्ज दिल्याने प्रथमवर्ग न्यायालयाच्या आदेशाने किनगाव पोलिसात आरोपींविरुद्ध आज (सोमवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विवाहिता कोमल (वय २१ वर्ष, रा. पिराचा तांडा, मोजमाबाद, ता. पालम, जिल्हा परभणी) हिचा विवाह विजय नगर तांडा खंडाळी येथील सुनील गोविंद जाधव (२५) याच्याशी २०२०मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नामध्ये लग्न खर्च म्हणून तीन लाख पन्नास हजार रुपये रोख, दोन तोळे सोने व संसारोपयोगी वस्तू दिल्याने काही दिवस सुखात गेले. पण नंतर तुझ्या घरच्यांकडून हुंडा कमी मिळाला. स्वत:चे दुकान टाकण्यासाठी आणखी पन्नास हजार रुपये घेऊन ये, म्हणून विवाहिता कोमल हिचा सतत शारीरिक, मानसिक छळ केला व तिला वारंवार शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. ती गरोदर असताना तिला धमक्या देऊन जाच, जुलूम करून छळ करून मुलीला व पोटातील बाळाला जीवे ठार मारले व विवाहितेच्या माहेरच्यांना ‘तुम्ही कुठे तक्रार केल्यास तुम्हालाही मारून टाकू’, अशी धमकी दिल्याने फिर्यादीने न्यायालयाकडे दाद मागितली होती. न्यायालयाने याची दखल घेऊन कलम १५६ (३ ) सीआरपीसीप्रमाणे गुन्हा नोंद करण्याबाबत किनगाव पोलीस स्थानकाला आदेशित केले. त्यामुळे संजय मोहन राठोड (वय ४२ वर्षे, रा. पिराचा तांडा, मोजमाबाद, ता. पालम, जिल्हा परभणी) यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुनील गोविंद जाधव, गोविंद शिवलाला जाधव, सखुबाई गोविंद जाधव, पारूबाई उत्तम जाधव ,शिवाजी तुळशीराम जाधव, सुभाष तुळशीराम जाधव, शानुबाई सुभाष जाधव (सर्व रा. विजयनगर तांडा, खंडाळी, ता. अहमदपूर) व अनिल रुस्तम राठोड, शाहूबाई अनिल राठोड (दोघे रा. पिराचा तांडा, मोजमाबाद, ता. पालम, जि. परभणी) यांच्याविरुद्ध गुरनं. २३३ / २०२१ कलम ३०२, ३१५, ३१६, ३०४ (ब) ३०६, ३२३, ४५२, ४९८ अ, ५०४, ५०६, ३४ भादंवि, हुंडा प्रतिबंधक कायद्याचे कलम ३, ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पाेलीस निरीक्षक शैलेश बंकवाड करत आहेत.