निटूर : महावितरणने थकीत वीज बिलापोटी निलंगा तालुक्यातील निटूर येथील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा तोडला आहे. परिणामी, चार दिवसांपासून गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. गावचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
निलंगा तालुक्यातील निटूर हे मोठे गाव आहे. गावास ताजपूर येथील तलावाजवळील विहिरीतून आणि गावातील विविध ठिकाणच्या बोअरद्वारे पाणीपुरवठा होतो. दरम्यान, महावितरणने थकीत बिलापोटी चार दिवसांपूर्वी पाणीपुरवठ्याच्या योजनांचा वीजपुरवठा तोडला आहे. परिणामी, गावातील नागरिकांना पाण्याची समस्या जाणवत आहे. त्यामुळे घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील सादनाथ मंदिर, सांब स्वामी मंदिर, बसस्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र, आदी ठिकाणच्या बोअरचा महावितरणने वीजपुरवठा तोडला आहे. गावातील सर्व ठिकाणच्या पाणीपुरवठ्याच्या बोअरचा वीज पुरवठा बंद असल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
विशेष म्हणजे, अत्यावश्यक सेवेत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन्ही बोअरचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. सध्या केंद्रात लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
नागरिकांनी कर भरणा करावा...
गावास पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा महावितरणने थकबाकीपोटी वीजपुरवठा तोडला आहे. सध्या ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी कर भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
वीज बिल भरणा करावा...
काही वर्षांपासूनची थकबाकी आहे. त्यामुळे वरिष्ठांनी हा निर्णय घेतला आहे. थकबाकी भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरू होणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने लवकरात लवकर वीज बिल भरणा करावा, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.