थकीत बिलांपोटी वीजपुरवठा तोडला; उदगीरात दोन दिवसांपासून अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:14 IST2021-07-01T04:14:58+5:302021-07-01T04:14:58+5:30

उदगीर : उदगीर पालिकेने कोट्यवधीची देयके न भरल्यामुळे ‘महावितरण’ने शहरातील रस्त्यावरील खांबाचा विद्युत पुरवठा तोडला आहे. परिणामी, सर्वसामान्यांना त्रास ...

Power outage due to overdue bills; Darkness for two days in Udgir | थकीत बिलांपोटी वीजपुरवठा तोडला; उदगीरात दोन दिवसांपासून अंधार

थकीत बिलांपोटी वीजपुरवठा तोडला; उदगीरात दोन दिवसांपासून अंधार

उदगीर : उदगीर पालिकेने कोट्यवधीची देयके न भरल्यामुळे ‘महावितरण’ने शहरातील रस्त्यावरील खांबाचा विद्युत पुरवठा तोडला आहे. परिणामी, सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी ये-जा करताना नागरिकांना चाचपडावे लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सहा महिन्यांत पालिकेचा दुसऱ्यांदा विद्युत पुरवठा तोडण्यात आला आहे.

उदगीर पालिकेकडे ‘महावितरण’ची १२ कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. त्यात ७ कोटींची स्ट्रीट लाईटची तर ५ कोटींची पाणीपुरवठा योजनेची आहे. याबाबत ‘महावितरण’ने वारंवार पाठपुरावा करूनही बिल न भरल्यामुळे महावितरणने दोन दिवसांपासून शहरातील रस्त्यावरील खांबाचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे तसेच पाणीपुरवठ्याचाही विद्युत पुरवठा बंद केला होता. दरम्यान, नगराध्यक्षांनी विनंती केल्याने पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा सुरु केला. परंतु, रस्त्यावरील खांबाचा विद्युत पुरवठा बंदच आहे. परिणामी, शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

उदगीर शहराचा भौगोलिक विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याने भौतिक सुविधा देण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. पालिका शहरातील नागरिकांकडून नियमित कर वसूल करते. परंतु, सुविधा देण्याकडे काही वर्षांपासून दुर्लक्ष करत असल्याचे पाहावयास मिळत आहे. विद्यमान सत्ताधारी पक्ष नेहमीच चर्चेत राहिला आहे. शहरातील नागरिकांना रस्ते, नाली, कचरा व पाणीपुरवठा नियमित होईल, अशी आशा होती. परंतु, थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांसह सर्वच सत्ताधारी नगरसेवकांनी नागरिकांची निराशाच केली आहे.

एप्रिलचाही बिल भरणा नाही...

‘महावितरण’च्या थकबाकीबाबत पालिकेला वारंवार संपर्क करावा लागतो. पालिका प्रशासन प्रतिसाद मिळत नसल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यासारखे निर्णय घ्यावे लागतात. थकबाकीच नव्हे तर एप्रिल २०२१ चे बिल अजूनही भरले नाही.

- एन.आर. देशमुख, अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण.

अनागोंदी कारभार...

विद्युत बिलांचा भरणा करण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे. त्यांच्या अशा अनागोंदी कारभारामुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे.

- मंजूरखाँ पठाण, गटनेता काँग्रेस.

त्रास दूर करावा...

याबाबत आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली आहे. पालिकेने वीजबिल भरून शहरवासीयांना होणारा त्रास दूर न केल्यास आंदोलन करण्यात येणार आहे.

- शेख समीर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी.

वीज बिल भरण्यात येईल...

मुख्याधिकारी दोन दिवस बाहेरगावी गेले आहेत. ते आल्याबरोबर महावितरणचे बिल भरून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल.

- आसिफ गोलंदाज, उपमुख्याधिकारी, पालिका.

Web Title: Power outage due to overdue bills; Darkness for two days in Udgir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.