महावितरणच्या दुर्लक्षामुळे विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:20 IST2021-05-20T04:20:36+5:302021-05-20T04:20:36+5:30
निलंगा तालुक्यातील केळगाव, कलांडी, शिरोळ वांजरवाडा येथे सतत विजेची समस्या निर्माण होत आहे. याबाबत सातत्याने गावातील नागरिकांनी अंबुलगा येथील ...

महावितरणच्या दुर्लक्षामुळे विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त
निलंगा तालुक्यातील केळगाव, कलांडी, शिरोळ वांजरवाडा येथे सतत विजेची समस्या निर्माण होत आहे. याबाबत सातत्याने गावातील नागरिकांनी अंबुलगा येथील महावितरण उपकेंद्र तसेच झरीच्या महावितरण उपकेंद्राकडे तक्रारी केल्या. तसेच सातत्याने खेटे मारत आहेत. परंतु, विविध कारणे सांगून तो दुरुस्त करण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे लाईनमन सांगत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडक उन्ह जाणवत आहे. त्यामुळे पंखा, कुलरचा वापर वाढला आहे. तसेच शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी वीजपुरवठ्याची गरज आहे. परंतु, विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू आहे. त्यामुळे नागरिकांना बाहेर पडता येत नाही. वीज नसल्याने घरातील पंखा, कुलर बंद आहेत. तसेच वीज कधी येते आणि कधी जाते याची शाश्वती नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
महिनाभरापासून दहा ते बारा तास वीज गूल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगूनही ते दुर्लक्ष करीत आहेत, असे कलांडी येथील साईनाथ सूर्यवंशी यांनी सांगितले.
लवकरच वीजपुरवठा...
तालुक्यातील काही ठिकाणी वादळी वा-यासह पाऊस झाल्याने बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला आहे. तो दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. यासंदर्भात अभियंत्यांना सूचनाही करण्यात आल्या आहेत. लवकरच दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, निलंगा येथील मुख्य अभियंता ढाकणे यांनी सांगितले.