सकारात्मक विचारातून नकारार्थी भाव कमी होण्यास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST2021-06-05T04:14:57+5:302021-06-05T04:14:57+5:30
लातूर : मानसिक आजारामुळे शारीरिक कार्यक्षमतेवर परिणाम होतो. मानसिक आरोग्य निकोप होण्यासाठी विवेकी विचारांची जोपासना केली पाहिजे. सकारात्मक विचार ...

सकारात्मक विचारातून नकारार्थी भाव कमी होण्यास मदत
लातूर : मानसिक आजारामुळे शारीरिक कार्यक्षमतेवर परिणाम होतो. मानसिक आरोग्य निकोप होण्यासाठी विवेकी विचारांची जोपासना केली पाहिजे. सकारात्मक विचार वाढवून नकारार्थी भाव कमी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मनोविकार तज्ज्ञ डॉ. वैशाली पाटील यांनी येथे व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मानसिक आरोग्य व्यवस्थापन व विविध उपक्रम विभागांतर्गत ‘मन उधाण वाऱ्याचे’ या विषयावर त्या बोलत होत्या. डॉ. पाटील म्हणाल्या, मनोविकारांबद्दल समाजात खूप अंधश्रद्धा आहेत. योग्य व वेळेत उपचार घेतल्यास तीव्र मनोविकार आटोक्यात आणणे शक्य आहे. मानसिक आरोग्य बिघडल्यास शरिराला त्रास होतो. मानसिक आरोग्य बिघडण्यास सामाजिक आणि जैविक कारणे आहेत. त्यामुळे जसे शारीरिक आरोग्य आपण जपतो, तसे मानसिक आरोग्यही आपण जपले पाहिजे. दररोज शरिराच्या स्वच्छतेबरोबर मनाची स्वच्छता नियमित केली पाहिजे. सकारात्मक विचार वाढवून नकारार्थी भाव कमी केले पाहिजेत. शारीरिक आरोग्याला आहार, व्यायाम आवश्यक आहे. तसे मानसिक आरोग्याला वाचन, निरीक्षण, अनुभव, चिंतन, मनन हे महत्त्वाचे आहे. मानसिक आजारातून व्यसनाधिनता वाढू शकते. त्यासाठी योग्य समुपदेशन व उपचार केल्यास व्यसनाधिनता नाहीशी करता येऊ शकते. कोरोना काळात मानसिक आरोग्य सुदृढ ठेवले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
‘अंनिस’चे प्रधान सचिव माधव बावगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक अतुल सवाखंडे यांनी केले. सूत्रसंचालन धर्मराज चवरे यांनी केले तर अजय भालकर यांनी आभार मानले.