निलंगा उपजिल्हा रुग्णालयास तत्काळ पोर्टा, ड्युरा ऑक्सिजन प्रणाली उपलब्ध करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:19 IST2021-04-22T04:19:15+5:302021-04-22T04:19:15+5:30
निलंगा येथे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत असून सध्या कोरोना संसर्गाने बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात येथे उपचार घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग ...

निलंगा उपजिल्हा रुग्णालयास तत्काळ पोर्टा, ड्युरा ऑक्सिजन प्रणाली उपलब्ध करावी
निलंगा येथे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत असून सध्या कोरोना संसर्गाने बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात येथे उपचार घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. ही चिंतेची बाब असून बाधित रुग्णांसाठी प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन अत्यंत गरजेचे आहे. या ऑक्सिजनच्या वापरासाठी निलंगा उपजिल्हा रुग्णालय येथे पोर्टा व ड्युरा ही प्रणाली उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या उपजिल्हा रुग्णालयास असलेले ३७ ऑक्सिजन सिलिंडर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सूचनेवरून उदगीर येथील सामान्य रुग्णालयास देण्यात आले आहेत. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजनचा वापर करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच ऑक्सिजन पुरवठादारास वारंवार विनंती करूनही नियमित पुरवठा होत नसल्याने या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.
रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होईल...
या बाबींचा विचार करून उदगीरच्या सामान्य रुग्णालयात ज्या पद्धतीने ऑक्सिजन प्रणाली उपलब्ध केली, तशीच निलंगा उपजिल्हा रुग्णालयास पोर्टा व ड्युरा ऑक्सिजन प्रणाली नवीन अथवा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. जेणेकरून या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा करणे सहज शक्य होऊन त्यांचे प्राण वाचविण्यास मोठी मदत होणार आहे. ही प्रणाली तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करून संबंधितांना आदेशित करावेत, अशीही मागणी माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी केली आहे.