अहमदपुरातील बांधकाम विभागाच्या कर्मचारी निवासस्थानाची दुरवस्था !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST2021-09-22T04:23:22+5:302021-09-22T04:23:22+5:30
अहमदपूर : येथील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरात सदनिका बांधण्यात आल्या होत्या. मात्र, मागील अनेक दिवसांपासून येथे कोणीच राहत नसल्याने ...

अहमदपुरातील बांधकाम विभागाच्या कर्मचारी निवासस्थानाची दुरवस्था !
अहमदपूर : येथील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरात सदनिका बांधण्यात आल्या होत्या. मात्र, मागील अनेक दिवसांपासून येथे कोणीच राहत नसल्याने सदनिकांची दुरवस्था झाली आहे. त्यातच मोकाट पशुधनाचा वावर वाढल्याने या परिसरात जाण्यासह भीती वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
अहमदपूर येथे कर्मचा-यांच्या निवासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदनिका बांधल्या आहेत. या सदनिकांची दुरवस्था झाल्याने
या सदनिकांमध्ये आता कोणीच राहत नसल्याने जनावरांचे वास्तव्य दिसून येते आहे. कर्मचाऱ्यांकडून काही दिवस या सदनिकांचा वापर झाला. मात्र, नंतरच्या कालावधीत सदनिका रिकाम्याच राहिल्या आहेत. ज्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची नियुक्ती अहमदपूर येथे करण्यात येते ते मोठ्या शहरात वास्तव्यास असल्याने अप-डाऊन करतात. त्यामुळे सदनिकांचा खर्च पाण्यातच गेल्याचे चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने कर्मचारी व अधिकारी यांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून उत्तम अशा सदनिका बांधून दिल्या होत्या. मात्र तेथे कोणीच अधिकारी, कर्मचारी वास्तव्यास नसल्याने या सदनिकाची दुरवस्था झाली आहे. यामुळे सदनिका बांधूनही त्याचा काही उपयोग न झाल्याने शासनाचा लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ गेला आहे.
सदनिकांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सदनिका राहण्यास योग्य नसल्यामुळे त्या वापरात नाहीत. त्यातील एका सदनिकेच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झालेला आहे. लवकरच त्या सदनिकेचे दुरुस्ती कामे करण्यात येतील. दुसऱ्या सदनिकेच्या दुरुस्ती निधीसाठी पाठपुरावा केला आहे. सदनिका दुरुस्ती निधी मिळाल्यास सदनिकेचे कामे पूर्ण होतील.
- पी.डी. मोरे,
उपविभागीय अभियंता