पॉलिटेक्निकचे तंत्र बिघडणार; १५ दिवसात केवळ २०० विद्यार्थ्यांचेच अर्ज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST2021-07-16T04:15:09+5:302021-07-16T04:15:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर ...

पॉलिटेक्निकचे तंत्र बिघडणार; १५ दिवसात केवळ २०० विद्यार्थ्यांचेच अर्ज !
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात दहावीच्या निकालाच्या आधीच पाॅलिटेक्निकची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ३० जूनपासून सुरु करण्यात आली आहे. मात्र, गेल्या १५ दिवसात केवळ २०० विद्यार्थ्यांचेच अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच अर्ज प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात जवळपास १२ तंत्रनिकेतनच्या संस्था असून, यामध्ये ३ हजार ५०० प्रवेश क्षमता आहे. तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ३० जूनपासून सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चिती करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत आहे. तर तात्पुरती गुणवत्ता यादी २६ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, दहावीच्या निकालाची वाट न पाहता तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांकडे गुणपत्रिका नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जामध्ये केवळ बैठक क्रमांक नोंदवायचा आहे. त्यानुसार दहावीचा निकाल जाहीर होताच प्राप्त गुण थेट ऑनलाईन अर्जात दाखवले जाणार आहेत. दरम्यान, अर्ज प्रक्रिया सुरु होऊन १५ दिवसांचा कालावधी होत असला, तरी आतापर्यंत केवळ २०० विद्यार्थ्यांचेच अर्ज प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील पॉलिटेक्निक - १२
एकूण प्रवेश क्षमता - ३५००
आतापर्यंत प्राप्त अर्ज - २००
अर्ज भरण्याची अखेरची मुदत - २३ जुलै
दहावी निकालानंतर वाढणार प्रतिसाद...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल जाहीर होण्यास वेळ लागला आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रिया राबविण्यास गैरसोय होऊ शकते. त्यामुळे निकालाच्या आधीच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अद्यापर्यंत केवळ २०० विद्यार्थ्यांचेच अर्ज आले असून, शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर अर्ज प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे चित्र आहे.
गेल्यावर्षी २० टक्के जागा रिक्त...
२०१९-२० या शैक्षणिक वर्षांत जिल्ह्यातील जवळपास २० टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. १२ तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये ३ हजार ५०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भाव अधिक असल्याने त्याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर झाला आहे. यावर्षी तंत्रनिकेतन प्रवेशाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे.
ऑनलाईन अर्जासाठी बैठक क्रमांक...
तंत्रनिकेतनची अर्ज प्रक्रिया ३० जूनपासून सुरु झाली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावरील बैठक क्रमांक अर्जासाठी ग्राह्य धरला जाणार आहे.
दहावीचा निकाल जाहीर होताच अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकानुसार दहावीचे गुण अर्जामध्ये समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
कोट...
३० जूनपासून तंत्रनिकेतन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, २३ जुलै अंतिम मुदत आहे. सध्या अर्जामध्ये दहावीच्या गुणांऐवजी बैठक क्रमांक टाकण्यास मुभा आहे. दरम्यान, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा अर्ज करण्याकडे कल वाढेल. - डॉ. के. एम. बकवाड, प्राचार्य, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन, लातूर.
विद्यार्थी म्हणतात...
कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे निकाल कसा लागतो, याबाबत उत्सुकता आहे. तंत्रनिकेतनला प्रवेश घेण्याची इच्छा असल्याने ऑनलाईन अर्ज केला आहे. निकाल लागला नसल्याने बैठक क्रमांक अर्जामध्ये नमूद केला आहे. कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी होत असल्याने विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. निकालात किती टक्के येतात आणि आवडीच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश मिळतो का, याची उत्सुकता आहे. - मानसी महामुनी
तंत्रनिकेतनला प्रवेश घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे अर्ज केला आहे. २३ जुलै अंतिम मुदत असून, दहावीचा निकालही जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लवकरच पार पडेल. अर्ज ऑनलाईन असल्याने कोणतीही गैरसोय झालेली नाही. कागदपत्रांत त्रुटी असल्यास ऑनलाईन त्रुटी दूर करण्याची सोय असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. - महेश पोतदार