दरोड्यातील ६ आरोपींना १२ तासांत पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:20 IST2021-04-01T04:20:46+5:302021-04-01T04:20:46+5:30
फिर्यादी प्रदीप माधव कदम (वय २१, रा. हनुमंतवाडी) मंगळवारी रात्री ११ वाजता लातूर येथून हनुमंतवाडीकडे जात असताना, अज्ञात आरोपींनी ...

दरोड्यातील ६ आरोपींना १२ तासांत पोलिसांनी घेतले ताब्यात
फिर्यादी प्रदीप माधव कदम (वय २१, रा. हनुमंतवाडी) मंगळवारी रात्री ११ वाजता लातूर येथून हनुमंतवाडीकडे जात असताना, अज्ञात आरोपींनी हनुमंतवाडीजवळ रस्त्यावर फिर्यादीची मोटारसायकल अडवून धारदार शस्त्र लावून त्याच्याकडील रोख रक्कम दीड हजार रुपये व एक मोबाईल असा १५ हजार ५०० रूपयांचा माल जबरीने चोरल्याप्रकरणी शिरूर-अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून सूचना केल्या. चाकूरचे उपविभागीय अधिकारी विद्यानंद काळे यांनी पथके नेमून शोध सुरू केला. शिरूर-अनंतपाळचे पोलीस निरीक्षक कदम यांंना मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश बाळू शेवाळे (रा. हडपसर, पुणे) यास दापका येथून ग्रामस्थांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. त्याची विचारपूस करण्यात आली असता, त्याने सहकारी राजकुमार नागनाथ पवार, सुनील अरविंद मोरे (रा. लांबोटा, ता. निलंगा, ह. मु. पुणे), अशोक तुकाराम शिंदे, नागेश गोपाळ निलेवाड, शुभम गायकवाड (रा. पुणे) आम्ही सर्वांनी मिळून चोरी केल्याचे कबूल केले. जेव्हा केव्हा पैशाची गरज पडते तेव्हा हे आरोपी सामूहिकरित्या अशाप्रकारचे गुन्हे करतात, असे पोलिसांनी सांगितले.
धारदार कत्ती, मोबाईल जप्त
या आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली धारदार कत्ती, मोबाईल व पैसे जप्त करण्यात आले आहे. तसेच नमूद आरोपींनी पोलीस ठाणे निलंगा हद्दीमध्येपण अशाचप्रकारचा गुन्हा केला असून, पोलीस ठाणे निलंगा येथे या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी उपविभगाीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, पोनि. कदम, स्वामी, सत्यवान कांबळे, विठ्ठल साठे, लतीफ सौदागर यांनी केली.