५० हजारांचा पदरमोड करून दुभाजकात वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:13 IST2021-07-24T04:13:59+5:302021-07-24T04:13:59+5:30
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी येथील एका सेवाभावी संस्थने कोणत्याही प्रकारचा निधी जमा न करता ...

५० हजारांचा पदरमोड करून दुभाजकात वृक्षलागवड
शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी येथील एका सेवाभावी संस्थने कोणत्याही प्रकारचा निधी जमा न करता अथवा शासन, प्रशासनाचे कोणतेही अनुदान न घेता, ५० हजारांची पदरमोड करून, राज्य मार्गावरील दुभाजकात बाॅटम पाम, आरेका पाम आणि फाॅक्सटेल या जातीच्या आकर्षक ५५ वृक्षांची लागवड ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केली.
सेवाभावी संस्था स्थापन करून, कागदी घोडे नाचवत शासनाच्या अनुदानावर लक्ष ठेवून काम करणाऱ्या काही संस्था, संघटना आहेत, परंतु येथील श्री अनंतपाळ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने खऱ्या अर्थाने सेवाभाव जोपासला आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. पहिल्यांदा ना नफा, ना तोटा या तत्त्वावर या संस्थेने वैकुंठ रथाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतर, सेवाभावी संस्थेने सेवाभावाचा उत्कृष्ट कृतिपाठ नागरिकांसमोर ठेवला आहे. शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्चून शहरातील वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी जवळपास दोन किमी अंतरात शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्गावर दुभाजकाचे बांधकाम केले. या दुभाजकात आजपर्यंत कोणीही वृक्षारोपण केले नव्हते. त्यामुळे केवळ खुरटे गवत, झुडपे दिसत होती. नगरपंचायतकडून थोडी-फार झाडे लावण्यात आली होती, परंतु देखभाल, पाणीपुरवठ्याअभावी ती नाहीशी झाली, परंतु या सेवाभावी संस्थेने मागील वर्षी लावलेल्या झाडांना जगविण्यासाठी स्वखर्चाने टँकर लावून उन्हाळ्यात पाणी दिले आहे. त्यामुळे अनेक झाडे जगली आहेत. यंदा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते बाॅटम पाम, आरेका पाम, फाॅक्सटेल अशा प्रकारची ५५ झाडे लावली आहेत. यावेळी डी.एन. लखनगावे, नरेंद्र शिवणे, किशन इंदलकर, वैजनाथ नाबदे, बापुराव देवंगरे, शंकर बेंबळगे, गोरोबाकाका शिवणे, उमाकांत देवंगरे, शिवराज शेरसांडे, बालाजी येरमलवार, बंडाप्पा चाकोते, त्र्यंबक मुरुडकर, शिवाजी मुदाळे, परमेश्वर तोंडारे, विजयकुमार संभाळे, भीमराव बावगे आदींची उपस्थिती होती.
प्रदूषण कमी करण्यास मदत...
शहरातून जाणाऱ्या वाहनांमुळे प्रदूषण निर्माण होते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण व्हावे, तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडावी, म्हणून श्री अनंतपाळ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने ५५ मोठी झाडे लावली असल्याचे संस्थेचे सचिव डी.एन. लखनगावे यांनी सांगितले. या वृक्षलागवडीमुळे आगामी काळात शहरील रस्ते आणखीन आकर्षक दिसणार आहेत.