तहसील कार्यालयाच्या परिसरात दीड हजार वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST2021-06-19T04:14:28+5:302021-06-19T04:14:28+5:30
शिरूर अनंतपाळ : शासनाच्या शतकोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात गुरुवारी मियावाकी पद्धतीचा अवलंब करून १५०० वृक्षांची लागवड ...

तहसील कार्यालयाच्या परिसरात दीड हजार वृक्षांची लागवड
शिरूर अनंतपाळ : शासनाच्या शतकोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात गुरुवारी मियावाकी पद्धतीचा अवलंब करून १५०० वृक्षांची लागवड करण्यात आली असून, तलाठी सज्जावरही ५०० झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे तालुक्यात शासनाच्या वृक्षलागवड मोहिमेस गती मिळणार आहे.
शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालयाच्या संरक्षण भिंतीच्या आत जवळपास दीड ते दोन एकर जागा असून मागील काळात येथे विविध वृक्ष लावण्यात आले आहेत; परंतु अद्याप वृक्षलागवड करण्यासाठी जागा शिल्लक असल्याने येथील तहसीलदार अतुल जटाळे यांनी महसूल प्रशासनासह विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन तालुक्यात जास्तीत जास्त वृक्षलागवड व्हावी म्हणून नियोजित कृती आराखडा तयार केला असून,त्याची अंमलबजावणी स्वतःच्या तहसील कार्यालयापासून केली आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरात गुरुवारी विविध प्रकारच्या १५०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार अतुल जटाळे, नायब तहसीलदार सुधीर बिरादार, आर. एन. पत्रिके, मंडळ अधिकारी डोंगरे, कुलकर्णी, ओमप्रकाश चिल्ले, नितीन बनसोडे, हणमंते, गणेश राठोड, गणेश भारती, शकील देशमुख, फथेअलीखाँ पठाण, तुषार ससाणे, महेताब शेख,मल्हारी शिंदे आदींची उपस्थिती होती. तालुक्यात १७ तलाठी सज्जे असून याअंतर्गत असलेल्या गावांमध्ये वृक्षलागवड केली जाणार आहे, दैठणा सज्जाअंतर्गत गावात लागवड केली जाणार असल्याचे तलाठी सदानंद साेमवंशी यांनी सांगितले.
ऑक्सिजन पार्कची निर्मिती...
तहसील कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेल्या १५०० वृक्षांमध्ये बहुतांश जांभूळ, चिंच, सीताफळ, आंबा , चिकू अशा फळझाडांचा समावेश असला तरी मोठ्या प्रमाणात तुळशीची रोपटे लावण्यात आली आहेत. नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटचे बँच टाकण्यात आले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या परिसरात ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे.