हरंगुळ बु. : हरंगुळ बु. ते लातुरातील बार्शी रोडवरील बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयानजीकच्या २ कि.मी.च्या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात तर वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघात घडत आहेत. संबंधित विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. हे जवळपास १० हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील नागरिकांसाठी सर्वांत जवळची बाजारपेठ ही लातूरची आहे. हरंगुळ बु. येथून लातुरात येण्यासाठी जवळचा मार्ग बार्शी रोडचा आहे. त्यामुळे गावातील बहुतांश नागरिक या रस्त्याचा वापर करीत असतात. त्यामुळे या रस्त्यावर सतत रेलचेल असते; परंतु गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविताना वाहनधारकांची कसरत होत आहे.
सतत या मार्गावरून ये- जा करणाऱ्यांना पाठीच्या मणक्यांचा त्रास जाणवत आहे, तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, खाजगी वाहनधारक भाड्याने आपली वाहने या मार्गावरून नेण्यास धजावत नाहीत. ते अन्य मार्गांचा वापर करत आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साचत असल्याने अनेकदा अंदाज येत नाही. परिणामी, वाहन स्लीप होऊन अपघात घडत आहेत.
रस्ता कामासाठी २० लाख मंजूर...
या रस्त्याच्या कामासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही कामास सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे नेमके काम का थांबले, असा सवाल वाहनधारकांसह नागरिकांतून करण्यात येत आहे. सदरील रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
किरकोळ अपघात वाढले...
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे खड्ड्यांत पाणी साचत आहे. बहुतांश वेळा वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात वाढले आहेत. सदरील रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी सातत्याने वाहनधारकांसह नागरिकांतून मागणी होत आहे.