लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : सध्याच्या तंत्रनाज्ञाच्या काळात सोशल मीडिया जनसंपर्काचे मोठे माध्यम बनले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या माध्यमावर सातत्याने व्यक्त होताना दिसून येतात. आपल्या बैठका, भेटी, विकासाशी संबंधित प्रश्नांवर मंत्री, अधिकाऱ्यांच्या भेटी, त्यांच्यासमवेत झालेल्या बैठका अशी विविध माहिती ते या प्लॅटफॉर्मवर मांडत आहेत. त्यांना नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यामुळे सोशल मीडिया जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे चित्र आहे.
खासदारांनाही प्रतिसाद...
खासदार सुधाकर श्रुंगारे हे फेसबुक आणि ट्विटरवर ॲक्टिव्ह आहेत. त्यांच्या फेसबुक पेजला १५ हजार २४५ तर ट्विटर अकाऊंटला १ हजार ९२५ फॉलोअर्स आहेत. आपल्याशी संबंधित माहिती ते नियमित शेअर करतात तसेच लोकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यास त्यांचे प्राधान्य असते.
अमित देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर टॉपला...
लातूर शहरचे आमदार तथा पालकमंत्री अमित देशमुख यांना फेसबुकवर १ लाख ५१ हजार तर निलंगा मतदार संघाचे आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना २ लाख ६० हजार फॉलोअर्स आहेत. जिल्ह्यात हे दोन लोकप्रतिनिधी टॉपला आहेत.
फॉलोअर्समध्ये सर्वाधिक तरुणाई...
लोकप्रतिनिधींना फॉलो करण्यात तरुणाईचा सर्वाधिक पुढाकार आहे. फेसबुक सोबतच अनेकजण ट्विटरवर ॲक्टिव्ह आहेत. त्यामुळे प्रत्येक माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवली जात आहे.
अकाऊंट हँडल करतात दुसरेच...
सोशल मीडियावर लोकांशी संपर्क साधताना लोकप्रतिनिधींची कसरत होते. एकाचवेळी अनेकांशी संपर्क साधणे, त्यांना उत्तरे देणे काहीसे जिकरीचे काम आहे. त्यामुळे जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींकडे अकाऊंट हँडल करण्यासाठी प्रशिक्षित व्यक्ती आहेत. या माध्यमावर व्यक्त होण्यापूर्वी लोकप्रतिनिधी मजकूर पाहून फायनल करतात. मगच ती पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली जाते.