शेंगदाणे, खाद्यतेलाच्या दरात पुन्हा वाढ; सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:18 IST2021-03-22T04:18:25+5:302021-03-22T04:18:25+5:30
लातूर : बाजारपेठेत भाजीपाल्यांची आवक स्थिर असून, मागणीही चांगली आहे. त्यामुळे गत आठवड्याच्या तुलनेत दर स्थिर असले तरी कोथिंबीर ...

शेंगदाणे, खाद्यतेलाच्या दरात पुन्हा वाढ; सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले !
लातूर : बाजारपेठेत भाजीपाल्यांची आवक स्थिर असून, मागणीही चांगली आहे. त्यामुळे गत आठवड्याच्या तुलनेत दर स्थिर असले तरी कोथिंबीर आणि गवारीच्या दरात प्रत्येकी २० रुपयांनी वाढ झाली आहे.
बाजारपेठेत हिरवी मिरची १५, टोमॅटो ४, फुलगोबी ६, पत्ताकोबी ३, करडई १५, चुका २५, वांगी १५, भेंडी ३५, काकडी १०, कारले ३५, दोडका ३०, भोपळा २०, गवार ७०, तोंडले ३०, कोथिंबीर ४०, शेवगा १५, चवळी ३०, वरणा ३५, गाजर २० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. तसेच मेथी पेंडी ३, पालक ५, शेपू ५, राजगिरा ५, अंबाडी पेंडी ५ रुपये दराने विक्री होत आहे.
गत आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्यांची आवक स्थिर असून, मागणीही चांगली आहे. दरम्यान, कोथिंबिरीच्या दरात २० रुपयांनी वाढ झाली असून, गवारीच्या दरातही २० रुपयांनी वाढ झाली आहे. शेवग्याच्या दरात १० रुपयांनी घट झाली असल्याचे भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले. दरम्यान, भुसार मालाच्या साहित्याचे दर स्थिर दिसत असले तरी खाद्यतेलाच्या दरात २० रुपयांनी आणि शेंगदाण्याच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच भगरीचे दर २० रुपयांनी वाढले आहेत.
बाजारपेठेत खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. १५० रुपये प्रतिकिलो असा दर झाला आहे. गत आठवड्याच्या तुलनेत २० रुपयांनी वाढ झाली आहे. शेंगदाणे दरात १० रुपयांनी वाढ होऊन ११० रुपये किलो असा दर झाला आहे. शाबुदाणा दरात १० रुपयांनी वाढ होऊन ६० रुपये, तर भगरीच्या दरात २० रुपयांनी वाढ झाली आहे. - रमण खंडागळे, दुकानदार
गत आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्यांची आवक चांगल्या प्रमाणात होत आहे. मागणीही चांगली आहे. कोरोनाच्या संकटामुळे विवाह समारंभ मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत होत असल्याने भाजीपाल्याला फारशी मोठी मागणी नाही. त्यामुळे दर स्थिर राहिले आहेत.
- रमेश चोथवे, भाजीपाला विक्रेता
तूरडाळीचा दर ११० रुपये प्रतिकिलो...
बाजारपेठेत तूरडाळ ११० रुपये, मसूरडाळ १००, मूगडाळ १२०, खोबरे १८०, चनाडाळ ८०, मैदा ३६, तांदूळ ५०, पोहे ३६ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत.