श्वानांमध्ये पसरतोय पाव्हरो व्हायरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST2021-04-09T04:20:07+5:302021-04-09T04:20:07+5:30
अहमदपूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कडक निर्बंध लागू करण्यात आले ...

श्वानांमध्ये पसरतोय पाव्हरो व्हायरस
अहमदपूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, मागील दीड- दोन महिन्यांपूर्वी बर्ड फ्ल्यूने शेकडो कोंबड्यांचा बळी घेतला आहे. आता पाळीव व मोकाट श्वानांमध्ये पाव्हरो व्हायरस नावाच्या विषाणूची लागण होत आहे. तालुक्यात ७८ श्वान या व्हायरसने संक्रमित झाले आहेत. हा व्हायरस पाळीव अथवा मोकाट श्वानांना होत असून, त्यास दोन ते तीन दिवस ताप येणे, उलट्या होणे, श्वानांची हालचाल थांबणे, त्यातच श्वानाचा मृत्यू होऊ शकतो.
एका श्वानापासून दुसऱ्या श्वानास मोठ्या प्रमाणावर संक्रमित होणारा हा आजार आहे. या आजारावर लस उपलब्ध असून, आठ ते नऊ महिन्यांच्या पिलांना ही लस दिल्यानंतर या व्हायरसचे संक्रमण होत नाही. त्यामुळे पाळीव श्वान असणाऱ्यांनी श्वानांना लस द्यावी, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अहमदपुरात २५, किनगाव २६, शिरूर ताजबंदमध्ये दोन श्वानांना संसर्ग झाला असून, अद्याप एकाही श्वानाचा मृत्यू झाला नाही.
व्हायरसची अशी आहेत लक्षणे...
एक वर्षातील श्वानांना या व्हायरसची लागण होते. दोन दिवस ताप येतो. रक्त, उलटी होते. संसर्ग अधिक झाल्यास मृत्यू होतो, असे पशुवैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, श्वानास ताप आल्यास, उलटी झाल्यास त्वरित पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. श्वानांच्या शरीरातील पाणी कमी होऊ न देणे, एक वर्षाच्या आतील पिलांना लसीचे डोस देणे महत्त्वाचे आहे.
माणसांना संसर्ग होत नाही...
अशी लक्षणे आढळल्यास श्वानांना त्वरित दवाखान्यात नेल्यास हा आजार निश्चित बरा होऊ शकतो. या आजाराचा मनुष्याला संसर्ग होत नाही. मोकाट कुत्र्यांपासून पाळीव प्राण्याला हा आजार होऊ शकतो. त्यासाठी पाळीव प्राणी असणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे अहमदपूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. गिरीश कोकणे यांनी सांगितले.