निवारा शेडही नसल्याने प्रवासी थांबतात पावसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST2021-08-29T04:21:15+5:302021-08-29T04:21:15+5:30
वलांडी : उदगीर-निलंगा राज्यमार्गावरील सर्वांत महत्त्वाचे ठिकाण असलेल्या वलांडी येथे प्रवाशांना थांबण्यासाठी बसस्थानकच नव्हे, तर प्रवासी निवारा शेडही उपलब्ध ...

निवारा शेडही नसल्याने प्रवासी थांबतात पावसात
वलांडी : उदगीर-निलंगा राज्यमार्गावरील सर्वांत महत्त्वाचे ठिकाण असलेल्या वलांडी येथे प्रवाशांना थांबण्यासाठी बसस्थानकच नव्हे, तर प्रवासी निवारा शेडही उपलब्ध नाही. त्यामुळे एसटी बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना उन्हाळ्यात उन्हात, तर पावसाळ्यात पावसात थांबावे लागत आहे. विशेष म्हणजे, नैसर्गिक विधीसाठी येथे तात्पुरत्या स्वरूपाचे स्वच्छतागृहही नाही. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
देवणी तालुक्यातील वलांडी हे गाव उदगीर- निलंगा राज्यमार्गावर आहे, तसेच कर्नाटकातील भालकी व बसवकल्याण तालुक्यासही येथून रस्ता जोडलेला आहे. गावात मोठी बाजारपेठ असल्याने सतत परिसरातील ३० ते ४० गावांतील नागरिक विविध कामानिमित्ताने, तसेच खरेदीसाठी येथे येत असतात. त्यामुळे सतत वर्दळ असते. या मार्गावरून दररोज उदगीर, निलंगा, उमरगा, पंढरपूर, अक्कलकोट, शिरूर अनंतपाळ, चाकुर, अहमदपूर, लातूर आणि सीमावर्ती भागातील गावांसह कर्नाटकातील भालकी, बसवकल्याण तालुक्यात बसेस धावत असतात.
याशिवाय खासगी वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. गावात शाळा, महाविद्यालय, दवाखाना, बँक, तसेच आठवडी बाजार भरत असल्याने सतत नागरिकांची खरेदीसाठी रेलचेल असते. त्यामुळे येथील स्थानक परिसरात नेहमी दररोज प्रवासी थांबलेले पहावयास मिळतात. मात्र, येथे अद्यापही बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली नाही, तसेच प्रवासी निवारा शेडही उभारण्यात आले नाही. परिणामी, प्रवाशांना रस्त्याच्या बाजूला एसटी बसची प्रतीक्षा करीत थांबावे लागत आहे.
वास्तविक पाहता येथे शैक्षणिक संस्था असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी ये- जा करीत असतात. मात्र, या विद्यार्थ्यांना पावसाळ्यात अथवा उन्हाळ्यात थांबण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे मोठी अडचण होत आहे, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी जवळच्या हॉटेलचा आधार घ्यावा लागत आहे. परिसरात तात्पुरत्या स्वरूपाचे स्वच्छतागृह उभारण्यात आले नाही. त्यामुळे मोठी कुचंबणा होत असल्याचे पहावयास मिळत आहे. काहीजण लघुशंकेसाठी अडोसा शोधतात. मात्र, खुल्या जागेत लघुशंका केल्याने दुर्गंधी पसरत आहे.
दोन वर्षांपासून स्वच्छतागृहाचे काम...
मागील पंचवार्षिक योजनेअंतर्गत वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक स्वच्छतागृह बांधकामासाठी सुरुवात केली. बांधकाम पूर्ण करण्यात आले; परंतु शौचालयाचे भांडे व इतर सुविधा अद्यापही पूर्ण करण्यात आल्या नाहीत. परिणामी, ही इमारत धूळ खात पडून आहे. त्यामुळे किमान हे काम तरी कधी होणार असा सवाल व्यक्त होत आहे.
प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष...
येथील बसथांब्याजवळ प्रवाशांच्या सेवेसाठी केवळ प्रवासी निवारा शेड तरी उभारण्यात यावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. मात्र, त्याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन येथील समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.