पानगाव : रेणापूर तालुक्यातील बाजारपेठेच्या दृष्टीने महत्त्वाचे गाव म्हणून पानगावची ओळख आहे. या भागातील प्रवाशाची गैरसोय लक्षात घेऊन पानगाव येथे १३ लाख रुपये खर्च करून १५ वर्षांपूर्वी सुसज्ज बसस्थानक उभारण्यात आले; परंतु ते गावाबाहेर असल्याने एकही प्रवासी बसस्थानकाकडे फिरकत नाही. परिणामी, उभारण्यात आलेल्या बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे.
रेणापूर तालुक्यातील पानगाव हे गाव बीड व लातूर सीमेवर वसलेले आहे. गावची लोकसंख्या २० ते २५ हजार असून, येथे शनिवारी आठवडी बाजारासह रोजच्या खरेदी विक्रीसाठी परिसरातील ३० ते ४० गावांतील नागरिक येतात. यादृष्टीने प्रवाशाची गैरसोय लक्षात घेऊन १३ लाख रुपये खर्चून १५ वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकालगत पानगाव बसस्थानकाची उभारणी केली. परंतु, ते गावाच्या बाहेर असल्याने प्रवाशांना व नागरिकांना जावे लागते. त्यामुळे गावातील मुख्य रस्त्यावरील असलेल्या थांब्यावर अनेक प्रवासी थांबतात. तेथूनच गाडी पकडतात. शिवाय अवैध प्रवासी वाहतूक करण्याचे थांबे गावातच आहेत. त्यामुळे प्रवासी बसस्थानकावर न जाता गावातील थांब्यावरूनच चढतात व उतरतात. त्यामुळे बसस्थानकात कोणी फिरकत नसल्यामुळे बसस्थानक प्रवाशांअभावी व वाहतूक नियंत्रकाअभावी ओस पडले आहे.
बसस्थानकाची दुरवस्था...
पानगाव येथील बसस्थानकाला संरक्षक भिंत नसल्याने मोकाट पशुधनाचा वावर वाढला आहे, तसेच वीज, पाण्याची सुविधा नसल्याने गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. प्रवाशांची ये-जा नसल्याने परिसरात स्वच्छता नाही. परिणामी, झाडे-झुडपे वाढले असून, याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.