पाणंद रस्त्यांची कामे करून शेतकऱ्यांना न्याय देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:22 IST2021-03-01T04:22:35+5:302021-03-01T04:22:35+5:30
चाकूर : तालुक्यातील पाणंद रस्त्यांचे काम जास्तीत जास्त प्रमाणात करून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पणन ...

पाणंद रस्त्यांची कामे करून शेतकऱ्यांना न्याय देणार
चाकूर : तालुक्यातील पाणंद रस्त्यांचे काम जास्तीत जास्त प्रमाणात करून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पणन महासंघाचे चेअरमन आमदार बाबासाहेब पाटील यांनी येथे केले.
चाकूर तालुक्यातील चापोली, उमरगा यल्लादेवी येथील अडीच किलोमीटरच्या शीव रस्त्याचे मातीकाम लोकसहभागातून हाेत आहे. या कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुमदळे, अहमदपूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, चाकूरचे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, जिल्हा सरचिटणीस गोपीनाथ जोंधळे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले उपस्थित होते. पूर्वीच्याकाळी एका कुटुंबात जमिनीचे क्षेत्र जास्त होते. त्यामुळे त्यांना पाणंद रस्त्याची अडचण भासत नसे. अलिकडच्या काळात शेतकरी कुटुंबातील विभक्त कुटुंबांची संख्या वाढली आहे. जमिनी कसण्यासाठीचे क्षेत्र कमी झाले आहे. परिणामी, पाणंद रस्त्याची गरज आता सर्वांना वाटत आहे. त्यातच वाहने थेट बांधापर्यंत नेण्यात येतात. यामुळे चाकूर तालुक्यातील पाणंद रस्त्यांचे काम करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले. चाकूर तालुक्यातील पाणंद रस्ते मोकळे करुन देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. ज्या ठिकाणचा पाणंद रस्ता मोकळा करायचा असेल, त्या भागातील शेतकऱ्यांनी रितसर निवेदन तहसीलदारांकडे द्यावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मुळे यांनी केले. या कार्यक्रमाला मंडल अधिकारी अभिशक्ता बिरादार, नयनसिंग ठाकूर, तलाठी बालाजी हाके, तलाठी नागनाथ खंदाडे, श्याम कुलकर्णी, तलाठी सुडके, सरपंच विष्णूकांत सोमवंशी, उपसरपंच विजयकुमार फुलसे, चांद मोमीन यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.