पालथे झोपा अन् रक्तातील ऑक्सिजन वाढवा; तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:20 IST2021-05-07T04:20:40+5:302021-05-07T04:20:40+5:30
लातूर : कोरोनाच्या काही रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांच्यातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी ३० मिनिटे ...

पालथे झोपा अन् रक्तातील ऑक्सिजन वाढवा; तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला सल्ला
लातूर : कोरोनाच्या काही रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांच्यातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी ३० मिनिटे ते दोन तास पालथे झोपण्याचा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे. कोरोना व न्यूमोनियाच्या रुग्णांनी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार पालथे झोपल्यास रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढू शकते, असा अनुभवही काही रुग्णांनी सांगितला आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. सौम्य, मध्यम आणि गंभीर लक्षणाचे रुग्ण उपचार घेत आहेत. यातील अनेक रुग्णांना ऑक्सिजन लावण्याबरोबरच आडंग बदलून काही वेळेसाठी झोपणे, पालथे झोपून ऑक्सिजन पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. घरीदेखील ऑक्सिजन पातळी वाढविण्याचा प्रयोग डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना करता येणार आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानेही गृह विलगीकरणातील कोरोना रुग्णांना पालथे झोपण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे रक्तातील प्राणवायूचे प्रमाण वाढते.
रक्तातील ऑक्सिजन वाढते
पालथे झोपताना पोटाचा भाग रिकामा ठेवावा. अर्धा ते दोन तास पालथे व नंतर तेवढाच वेळ उजव्या कुशीवर झोपावे. पुन्हा अर्धा तास भिंतीला पाठ टेकून उठून बसावे. पुन्हा अर्धा तासानंतर डाव्या कुशीवर झोपावे. नंतर पुन्हा पालथे झोपावे. यातून ऑक्सिजनची पातळी वाढते. दिवसातून अनेकवेळा हा प्रकार करावा. घरी असलेल्या रुग्णांना देखील ही थेरेपी करता येईल. यामुळे व्हेंटिलेशन चांगले होते.
- डाॅ. विश्रांत भारती, एमडी. मेडिसीन
पालथे झोपण्याचे फायदे
शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण ९५ पेक्षा पुढे असणे आवश्यक आहे. कोरोना बाधित रुग्णांची पातळी कमी असेल तर त्यांनी पालथे झोपण्याचा प्रयोग करावा. यामुळे शरिरातील ऑक्सिजनची पातळी चांगली वाढते. न्यूमोनिया व कोरोनाचा संसर्ग पसरत नाही. दिवसातून बारा ते सोळा तास आडंग बदलून हा प्रयोग केल्यानंतर चांगला फायदा होतो. यामुळे व्हेंटिलेटर लागत नाही.
- डाॅ. मारुती कराळे, एम.डी. मेडिसीन