लातूर : डॉ.एन.वाय. तासगांवकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी चांदई (ता. कर्जत) येथे प्रथम वर्षात शिकत असलेल्या लातूरच्या एका विद्यार्थ्याला वसतिगृहातील त्याच्या सिनिअर्सकडून इन्स्टाग्राम अकाउंटवर मिम्स बनविल्याचा संशय घेऊन जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात (जि. रायगड) दहा ते अकरा जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
लातूर येथील पाखरसांगवी रोड खाडगाव परिसरातील रहिवासी असलेला अरहंत मनोज लेंडाणे हा विद्यार्थी डॉ.एन.वाय. तासगांवकर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, चांदई, ता. कर्जत येथे प्रथम वर्षात शिकत आहे. महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये रुम नं. ए, ०२ मध्ये निवासी आहे. २ जून रोजी महाविद्यालयात परीक्षा देऊन आल्यानंतर हॉस्टेलमधील रुमवर दुपारी १ वाजता येऊन त्याने आराम केला. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता हॉस्टेलवर एक वर्षाने सिनिअर असणारे विद्यार्थी रुमवर आले. त्यांनी ‘तासगांवकर मिम’ हे इन्स्टाग्राम अकाऊंट कोणाचे आहे, अशी विचारणा त्याला केली. माझे नाही असे सांगितल्यानंतर त्यांनी मला जबर मारहाण केली.
मारहाणीचे केले शूटिंग चपराशी बनायची लायकी नाही आणि डॉक्टर बनायला आला असे म्हणून मारहाण करीत होते. या मारहाणीचे एकाने शुटिंग केले, असे अरहंत लेंडाणे याने कर्जत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार दहा ते अकरा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.