गॅसच्या किमती आवाक्याबाहेर, सामान्यांच्या अर्थकारण बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST2021-03-07T04:18:20+5:302021-03-07T04:18:20+5:30
गॅस सिलिंडरच्या सततच्या वाढत्या किमतींमुळे गॅसचा वापर केवळ चहा करण्यासाठीच केला जात आहे. ग्रामीण भागात या योजनेच्या माध्यमातून ...

गॅसच्या किमती आवाक्याबाहेर, सामान्यांच्या अर्थकारण बिघडले
गॅस सिलिंडरच्या सततच्या वाढत्या किमतींमुळे गॅसचा वापर केवळ चहा करण्यासाठीच केला जात आहे. ग्रामीण भागात या योजनेच्या माध्यमातून गॅस पोहोचविले, तरी महिला वाढत्या दराच्या भीतीने अद्यापही चुलीवरच स्वयंपाक करताना दिसून येत आहेत. गॅस सिलिंडरच्या वाढत्या महागाईमुळे खेड्यांमधून पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. दुकानांतून रॉकेल मिळत नसल्याने गृहिणी गोवऱ्या, सरपणाकडे वळल्या आहेत. धुरापासून मुक्तीसाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली. शंभर रुपयांत जोडणी मिळत असल्याने, सुरुवातीच्या काळात योजनेला प्रतिसाद मिळाला. गॅस जोडणीनंतर मात्र सिलिंडरची मागणी हळूहळू कमी होत गेली. चुली धूर ओकू लागल्या आहेत. अनुदानित सिलिंडरच्या किमतीतील दरवाढ आवाक्याबाहेर गेल्याने आपली चूलच बरी... अशी भावना गरीब कुटुंबातील महिलांमधून व्यक्त हाेत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करून इंधनाचा वापर केला जातो. यामुळे वायुप्रदूषणाबरोबरच पर्यावरणाचाही ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत आहे. गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना त्रास होताे. यामुळे डोळे, श्वसनाचा आजार होऊन आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी महिलावर्गातून केली जात आहे.
विशेष म्हणजे, उज्ज्वला योजनेतून ज्यांना गॅस मिळाला आहे. त्यांना शासन सवलत अनुदान देत नाही.
सिलिंडर अडगळीत, केरोसिनही बंद...
केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस जोडणी योजनेंतर्गत मोफत गॅस जोडणी देण्यात आली. बहुतांश घरात गॅस जोडणी दिली. मात्र, त्यामुळे त्या कुटुंबाचा रेशनकार्डवरील रॉकेल पुरवठा बंद झाला आहे.
रॉकेल मिळेना, सिलिंडरचे भाव परवडेना, रॉकेल मिळेना, सिलिंडरचे भाव वाढले. परिणामी, सिलिंडर खरेदी करणे महागात पडत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील अनेक सिलिंडर अडगळीत पडल्याचे दिसून येत आहे. भाव वाढल्याने सिलिंडर खरेदी करता येत नाही आणि रेशन कार्डवरील रॉकेलही मिळत नाही. परिणामी, ग्रामीण भागातील महिलांना दुहेरी संकटाला सामाेरे जावे लागत आहे.