७८५ पैकी ३०९ ग्रा.पं.मध्ये हाताला काम; रोहयोवर ६ हजार मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:21 IST2021-03-09T04:21:56+5:302021-03-09T04:21:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी ...

७८५ पैकी ३०९ ग्रा.पं.मध्ये हाताला काम; रोहयोवर ६ हजार मजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. जिल्ह्यात ७८५ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ३०९ ग्रामपंचायतींमध्ये रोहयोची ७३२ कामे सुरू असून, या कामांवर ६ हजार १२ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजना विभागाकडे पावणेतीन लाख कुटुंबातील ६ लाख मजुरांची नोंदणी आहे. त्यापैकी २ लाख ६० हजार जॉब कार्डधारक असून, मागणीनुसार काम उपलब्ध करून दिले जात आहे. सध्या ३०९ ग्रामपंचायतींमध्ये ७३२ कामे सुरू आहेत. या कामांवर ६ हजार १२ मजूर कार्यरत असून, लॉकडाऊनमुळे अनेकांचे स्थलांतर झाले. त्यांच्या हाताला या उपक्रमाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. मागणीनुसार तात्काळ काम उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना रोहयो विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
निलंगा तालुक्यात सर्वाधिक गावांत कामे...
निलंगा तालुक्यात सर्वाधिक गावांत कामे सुरू आहेत. यामध्ये अहमदपूर ३४, औसा ५१, चाकूर २८, देवणी १७, जळकोट २१, लातूर ३२, निलंगा ४५, रेणापूर ३१, शिरूर अनंतपाळ १९, तर उदगीर तालुक्यात ३१ ग्रामपंचायतींमध्ये रोहयोची कामे सुरू आहेत. तर औसा तालुक्यात १५११ मजूर, निलंगा ७४०, लातूर ८४५ तर उदगीर तालुक्यात ५६० मजूर कार्यरत आहेत.
लॉकडाऊनमुळे हाताला काम मिळत नव्हते. त्यामुळे रोजगार हमी योजनेकडे नोंदणी केली. कामाची मागणी केल्यानंतर तात्काळ रोजगार उपलब्ध झाला आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. मात्र रोहयोच्या कामावर रोजगार मिळाल्याने उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे. - रोहयो मजूर
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वृक्ष लागवड तसेच विविध कामे होतात, याची माहिती ग्रामरोजगार सेवकाकडून मिळाली. त्यानुसार रोहयो विभागाकडे नोंदणी केली. जॉब कार्ड मिळविले. त्यामुळे हाताला काम उपलब्ध झाले आहे. या योजनेमुळे बेरोजगारांना रोजगाराचे साधन मिळाले असून, आर्थिक अडचण दूर होण्यास मदत झाली आहे. - रोहयो मजूर
रोहयोचा आराखडा
२,६०,०००
जिल्ह्यातील एकूण जॉब कार्डधारक
७३२
सध्याची सुरू असलेली कामे
तालुकानिहाय स्थिती
तालुका ग्रामपंचायती कामे सुरू ग्रा.पं.
अहमदपूर ९७ ३४
औसा १०९ ५१
चाकूर ७१ २८
देवणी ४५ १७
जळकोट ४३ २१
लातूर ११० ३२
निलंगा ११६ ४५
रेणापूर ६५ ३१
शिरूर अ. ४५ १९
उदगीर ८७ ३१