एमपीएससी परीक्षेला संधीचे बंधन; तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:20 IST2021-01-03T04:20:47+5:302021-01-03T04:20:47+5:30

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना संधीचे बंधन घालून देण्यात आले ...

Opportunity constraints to MPSC exams; Dissatisfaction among students preparing | एमपीएससी परीक्षेला संधीचे बंधन; तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर

एमपीएससी परीक्षेला संधीचे बंधन; तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना संधीचे बंधन घालून देण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ६ वेळेस परीक्षा देता येणार असून, इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ९ वेळेस परीक्षा देता येणार आहे. अनुसूचित जाती -जमातीमधील उमेदवारांना कमाल मर्यादेचा नियम लागू राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे़ लातूर जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे़ या निर्णयामुळे काही विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला असून, काहींनी तीव्र नाराजी तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे़ आयोगाने नियमात बदल केला असला तरी परीक्षांचे अर्ज, वेळापत्रक याबाबत काटेकोर पालन करण्याची मागणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे़

अशाप्रकारे होईल संधीची गणना

एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा विद्यार्थी पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर परीक्षार्थी कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याचा प्रवेश रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.

आयोगाच्या निर्णयाचे स्वागत...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्य लोकसेवा आयोगाने संधीचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयाचे स्वागत आहे़ त्यामुळे आयोगाने पूर्व, मुख्य, मुलाखत, निकाल आदी बाबींच्या तारखा अगोदर जाहीर कराव्यात़ यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल़

-रामेश्वर सोडगीर, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी.

वेळेवर निकाल जाहीर करावा...

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे़ परीक्षा झाल्यावर वेळेवर निकाल लागत नाही़ त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा घेतल्यानंतर वेळेवर निकाल जाहीर करावा़ या नवीन निर्णयाचे स्वागत असून, यामुळे विद्यार्थी अधिक जोमाने तयारी करतील़

-मेहरुन शेख, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी.

योग्य प्रमाणात जागा भराव्यात...

या निर्णयाचे स्वागत आहे़; मात्र आयोगाने यूपीएससीच्या धर्तीवर जास्त जागांवर भरती प्रक्रिया राबवावी़ अनेक वर्षांपासून विद्यार्थी तयारी करत आहेत़ मोजक्याच जागा असल्याने तयारी करणाऱ्यांचा हिरमोड होतो़ संधीबाबत निर्णय योग्य असला तरी इतर बाबींचा विचार व्हावा़

-सारिका जमादार, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी.

विद्यार्थी अभ्यासाला लागतील...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यूपीएससीच्या धर्तीवर घेतलेला निर्णय योग्य आहे़ परीक्षांचे वेळापत्रक अगोदर जाहीर करण्याची आवश्यकता आहे़ संधीच्या निर्णयामुळे विद्यार्थी जोमाने अभ्यास करतील़ परिणामी, शासकीय सेवेत लवकर निवड होईल़

-सरोजा शिंदे, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी.

Web Title: Opportunity constraints to MPSC exams; Dissatisfaction among students preparing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.