क्रीडा क्षेत्रातील संधी खेळाडूंसाठी लाभदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST2021-07-25T04:18:03+5:302021-07-25T04:18:03+5:30
लातूर : क्रीडा क्षेत्राकडे पारंपरिक दृष्टीने न पाहता करिअरच्या नवनव्या संधी म्हणून पाहावे, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव ...

क्रीडा क्षेत्रातील संधी खेळाडूंसाठी लाभदायक
लातूर : क्रीडा क्षेत्राकडे पारंपरिक दृष्टीने न पाहता करिअरच्या नवनव्या संधी म्हणून पाहावे, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी येथे केले.
येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील नूतन व्यायामशाळेच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे हे होते तर मंचावर क्रीडा अधिकारी नाईकवाडे, पर्यवेक्षक प्रा. मनोहर कबाडे, प्रा. डॉ. कॅप्टन बाळासाहेब गोडबोले, प्रा. गुणवंत बिरादार, प्रा. डॉ. जितेंद्र देशमुख, प्रा. डॉ. यशवंत वळवी, क्रीडा विभागप्रमुख प्रा. डॉ. नल्ला भास्कर रेड्डी, प्रा. आशिष क्षीरसागर उपस्थित होते. कसगावडे म्हणाले, क्रीडा क्षेत्राकडे व्यावसायिक अंगाने खेळाडूंनी पाहिले पाहिजे. या क्षेत्रात सेवा, संधी भरपूर प्रमाणात आहेत. मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा आहे. या ऊर्जेचा वापर करून विविध क्रीडा प्रकारांत आपला सहभाग नोंदवावा. शासकीय स्तरावर खेळाडूंकरिता अनेक सुविधा आहेत, त्यांचा लाभ घ्यावा. मेहनतीच्या बळावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केल्यास रोख पुरस्कारासह वर्ग एक, दोन अधिकारी होण्याची सुवर्णसंधी आहे, असेही ते म्हणाले. यावेळी क्रीडा विभागातील गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. डॉ. नल्ला भास्कर रेड्डी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. रत्नाकर बेडगे यांनी केले तर प्रा. गुणवंत बिरादार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विष्णू तातपुरे, महेश तातपुरे, विशाल गंभीरे, अमोल सांडूर, आकाश गड्डे, शिवराज हाके, आदींनी परिश्रम घेतले.
खेळामुळे शारीरिक विकास...
प्राचार्य डॉ. डोंगरगे म्हणाले, खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असून, विविध प्रकारच्या खेळांमुळे शरीर, मन आणि मेंदूची उत्तम वाढ व विकास होतो. खेळातून भावनिक विकास होऊन मैत्रीभाव, संघभावना, जिद्द, चिकाटी, निर्णयक्षमता अशा अनेक सद्गुणांचाही विकास होतो.