लातूर : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांना टाळे लागले आहे. त्यामुळे भाविक-भक्तांना कळसाचेच दर्शन घ्यावे लागत आहे. गत मार्च २०२०पासून टप्प्याटप्प्याने लाॅकडाऊनची प्रक्रिया सुरु झाली आणि मंदिरांचे दार बंद झाले. तब्बल दीड वर्षापासून हे दार बंद ठेवण्यात आले असून, परिसरातील व्यापाऱ्यांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेकांचे अर्थचक्रच थांबले आहे. सध्या काही मंदिरात हाेणाऱ्या नित्यपूजेला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, भाविकांसाठी ही मंदिरे खुली करण्यात आलेली नाहीत. ‘उघड दार देवा आता उघड दार देवा’ असेच म्हणण्याची वेळ भाविक-भक्तांवर आली आहे.
लातुरातील गंजगाेलाई, गांधी चाैक, गावभाग परिसर, बसस्थानक परिसरातील मंदिरांसह इतर ठिकाणच्या मंदिरांचे दार बंदच आहे. तर जिल्ह्यात सावरगाव, वडवळ नागनाथ, शिरुर ताजबंद, शिरुर अनंतपाळ, निलंगा, डाेंगरशेळकी, किनी यल्लादेवी- शेळगावसह इतर ठिकाणच्या मंदिरांची दारे सध्या भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. भाविकांनी गर्दी करु नये, यासाठी धार्मिक कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. आता अनलाॅकचा टप्पा सुरु झाला आहे. त्यामुळे मंदिरांचे दार कधी उघडणार, याकडेच भाविकांचे लक्ष लागले आहे.
किती दिवस कळसाचेच घ्यायचे दर्शन?
गत मार्चपासून ठिकठिकाणच्या मंदिरांचे दार बंद आहे. त्यामुळे आम्हाला कळसाचेच दर्शन घ्यावे लागत आहे. आता अजून किती दिवस हे दर्शन घ्यावे लागेल, असा प्रश्न भाविक-भक्तांमधून विचारला जात आहे. येथून जवळच असलेल्या तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकाेट आणि गाणगापूरलाही जाता आले नाही.
- पुंडलिक जाधव, भाविक
दरिदन मी गंजगाेलाईत देवीच्या दर्शनासाठी जाताे. सध्या बाहेरुनच देवीचे दर्शन घेऊन परत जावे लागते. गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे दार कधी उघडणार, याचीच प्रतीक्षा आता आम्हाला लागली आहे. मंदिराचे दारच बंद असल्याने कळसाचेच दर्शन घ्यावे लागत आहे.
- ज्ञानेश्वर सूर्यवंशी, भाविक
नियमांचे पालन करुन मंदिर उघडण्याची गरज
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मंदिरांचे दार बंद आहे. मात्र, आता अनलाॅकचा टप्पा सुरु झाला असून, सर्वच व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. काेराेना नियमांचे पालन करुन मंदिर उघडण्याला परवानगी देण्याची गरज आहे. मंदिर उघडले तर अनेकांना यातून राेजगार मिळणार आहे. परिसरातील दुकानदारांची उपासमार सुरु झाली आहे.
व्यावसायिकांचे आर्थिक गणित काेलमडले
लाॅकडाऊनची प्रक्रिया सुरु झाली आणि मंदिराबराेबरच आमच्याही दुकानांना टाळे लागले. यातून दुकानभाडे आणि इतर खर्च कसा भागवायचा? हाच प्रश्न गत दीड वर्षांपासून आम्हाला सतावत आहे. यातून अर्थचक्रच ठप्प झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
काेराेनाने मंदिर परिसरात थाटलेल्या दुकानदारांवर माेठे संकट ओढवले आहे. गत काही महिन्यांपासून पदरमाेड करुन दुकान भाडे भरावे लागत आहे. यातून जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अजून किती दिवस हाेणारा आर्थिक ताेटा सहन करायचा, असा प्रश्न व्यावसायिकांकडून विचारला जात आहे.