१९ पैकी दोनच प्रस्तावाला मिळाली मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:15 IST2021-06-06T04:15:32+5:302021-06-06T04:15:32+5:30
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांनी शासनाच्या गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून मागील वर्षी ...

१९ पैकी दोनच प्रस्तावाला मिळाली मंजुरी
शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांनी शासनाच्या गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून मागील वर्षी तालुका कृषी कार्यालयामार्फत १९ प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी केवळ दोन प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. उर्वरित १२ प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रस्तावधारकांना मंजुरीची प्रतीक्षा लागली आहे.
तालुक्यात मागील वर्षात विविध प्रकारच्या नैसर्गिक अपघातात १९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांकडून शासनाच्या गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा, म्हणून तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधून १९ प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे दाखल केले होते. त्यापैकी केवळ दोन प्रस्तावास मंजुरी मिळाली असून, उर्वरित १२ प्रस्ताव विविध कारणांस्तव प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील प्रस्तावधारकांना मंजुरीची प्रतीक्षा लागली आहे. वर्ष उलटले तरीही अपघात विमा योजनेचे प्रस्ताव मंजूर होत नसल्याने आमच्या कुटुंबांस शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ कधी मिळणार असा सवाल केला जात आहे.
खरीपापूर्वी तरी मदत मिळावी...
अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून वर्षभरापूर्वी प्रस्ताव दाखल केले आहेत. परंतु विविध कारणांनी प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी तरी शेतकरी अपघात विमा योजनेची मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
विमा कंपनीकडे प्रस्ताव...
तालुका कृषी कार्यालयाकडून दाखल करण्यात आलेले १९ पैकी १२ प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत. ५ प्रस्तावास काही कागदपत्रांची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांकडून त्याची पूर्तता झाली नसल्याने प्रलंबित राहिले आहेत. दरम्यान, कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे कृषी अधिकारी शिवप्रसाद वलांडे यांनी सांगितले.