भाविकांना ऑनलाईन दर्शन; मंदीरास येण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST2021-03-13T04:35:20+5:302021-03-13T04:35:20+5:30
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचा यात्रा महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त १५ दिवस विविध धार्मिक, ...

भाविकांना ऑनलाईन दर्शन; मंदीरास येण्यास बंदी
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचा यात्रा महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त १५ दिवस विविध धार्मिक, सामाजिक व प्रबोधनपर उपक्रम आयोजित केले जातात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केवळ पारंपारिक धार्मिक विधी पार पडणार आहेत. त्यानुसार बुधवारी मध्यरात्री प्रथेप्रमाणे गवळी समाजाच्या वतीने श्री सिद्धेश्वर देवस्थानास दुग्धाभिषेक करण्यात आला. यासाठी केवळ ५ जणांनाच परवानगी देण्यात आलेली होती.
गुरुवारी सकाळी माळी समाजाचा पुष्पाभिषेक पार पडला. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व त्यांच्या पत्नी सीमा यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. याप्रसंगी महापौर विक्रांत गोजमगुंडे,वर्षा गोजमगुंडे, उपजिल्हाधिकारी सुनील यादव, देवस्थानच्या प्रशासक यु.एस.पाटील, सचिव अशोक भोसले, विश्वस्त बाबासाहेब कोरे, विशाल झांबरे, देवस्थानचे व्यवस्थापक दत्ता सुरवसे यांची उपस्थिती होती.
मंदिर परिसरातच मिरवणूक...
प्रथेप्रमाणे दरवर्षी बाजार समितीमधील गौरीशंकर मंदिरापासून मानाच्या काठ्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. परंतु यावर्षी ही मिरवणूक मंदिर परिसरातच झाली. मानकऱ्यांच्या हस्ते तेथेच काठ्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. या मानाच्या काठ्यांमध्ये गोजमगुंडे परिवाराचीही काठी असते. महापौर विक्रांत गोजमगुंडे, वर्षा गोजमगुंडे तसेच परिवारातील सदस्यांनी मानाच्या काठीचे पूजन केले.
पोलीसांचा बंदोबस्त...
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केवळ पारंपारिक धार्मिक विधी पार पडणार आहेत. प्रशासनाच्या वतीने देवस्थान परिसरात सुरक्षिततेसाठी पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. मंदिर बंद असल्याने भक्तांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.