‘लॉकडाऊन’ काळातील एक हजार गुन्हे होणार रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:37+5:302021-02-05T06:23:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लाॅकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ९७८ वाहन चालक, नागरिकांविरोधात ...

‘लॉकडाऊन’ काळातील एक हजार गुन्हे होणार रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लाॅकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ९७८ वाहन चालक, नागरिकांविरोधात त्या-त्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यातून या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
लातूर शहर आणि जिल्हाभरातील एकूण २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. या दरम्यान ठिकठिकाणी नाकाबंदी, पोलिसांची नजर होती. या कालावधीत बेकायदेशीरपणे, जिल्हा आणि पोलीस प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता बिनधास्तपणे घराबाहेर पडणाऱ्या वाहनचालक, मालक आणि नागरिकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनापरवाना घराबाहेर पडणे ८२, दुकान उघडणे ८३, वाहनातून प्रवास करणे ५३ आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ७६० जणांवर खटले दाखल करण्यात आले होते. आता ते मागे घेतले जाणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने नियमावली जाहीर करण्यात आली आहे. लाॅकडाऊन काळात नियमांचे पालन न करणाऱ्यांवर प्रामुख्याने खटले दाखल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलमानुसारही गुन्हे दाखल आहेत. लातूर शहर आणि जिल्हाभरातील पोलीस ठाण्यांत तब्बल ९७८ नागरिकांवर रीतसर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये विनापरवाना घराबाहेर पडणे, निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ दुकाने उघडे ठेवणे, विनापरवाना प्रवास केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
- निखिल पिंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक, लातूर.