रहदारीला अडथळा; वाहनधारकांवर खटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST2021-04-10T04:19:33+5:302021-04-10T04:19:33+5:30
लातूर : शहरातील एमआयडीसी परिसरात रहदारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा स्थितीत वाहन थांबविणाऱ्या वाहनधारकांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात ...

रहदारीला अडथळा; वाहनधारकांवर खटले
लातूर : शहरातील एमआयडीसी परिसरात रहदारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा स्थितीत वाहन थांबविणाऱ्या वाहनधारकांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्वतंत्र खटले दाखल करण्यात आले आहेत. निष्काळजीपणे रस्त्याच्या मध्यभागी वाहन थांबविणे चालकांना अंगलट आले आहे.
पोलिसांनी सांगितले, बार्शी रस्त्यावरील पाच नंबर चौकात एका चालकाने आपल्या ताब्यातील वाहन (एमएच २४ एयू ३८७२) सार्वजनिक रस्त्यावर मध्यभागी थांबवून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनास अडथळा निर्माण केला. स्वत:सह इतरांच्या जीवितास धोका होईल, अशा स्थितीत वाहन थांबविल्याचे आढळून आले. याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा नोंद आहे.
तर दुसऱ्या घटनेत लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका परिसरात एका वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन (एमएच २४ एबी ८४१३) सार्वजनिक रस्त्यावर, रस्त्याच्या मध्यभागी थांबवून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहनांना अडथळा निर्माण केला. स्वत:सह इतरांच्या जीवितास धोका होईल, अशा स्थितीत आपल्या ताब्यातील वाहन थांबविल्याचे आढळून आले. या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना गुरुवारी लातूर शहरात घडली. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल देशमुख करीत आहेत.
पोलिसांची कारवाई
लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यासह इतर ठाण्यांच्या हद्दीतही बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. लातुरातील नवीन रेणापूर नाका परिसरात एका चालकाने आपल्या ताब्यातील वाहन (एमएच २० जे ९४६२) रस्त्याच्या मध्यभागी थांबवून नागरिकांसह वाहनधारकांना अडथळा निर्माण केला. शिवाय, स्वत:सह इतरांच्या जीवितास धोका होईल, अशा स्थितीत वाहन थांबविले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदर चालकाविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना गुरुवारी (दि. ८) घडली.