जिल्ह्यात रुग्ण वाढले; ऑक्सिजन बेड मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:19 IST2021-04-22T04:19:26+5:302021-04-22T04:19:26+5:30

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, सध्या १६ हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. यातील अनेकांना ऑक्सिजनची गरज ...

The number of patients increased in the district; No oxygen bed! | जिल्ह्यात रुग्ण वाढले; ऑक्सिजन बेड मिळेना !

जिल्ह्यात रुग्ण वाढले; ऑक्सिजन बेड मिळेना !

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, सध्या १६ हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. यातील अनेकांना ऑक्सिजनची गरज आहे. मात्र, ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने रुग्ण व नातेवाईकांचे हाल होत आहेत. दरम्यान, पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळवण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात सद्यस्थितीत चारशे ते सव्वाचारशे रुग्ण दाखल आहेत. या रुग्णालयाला दररोज आठ हजार लीटर ऑक्सिजन लिक्विडची गरज आहे. परंतु, सध्या साडेचार हजार लीटर ऑक्सिजन लिक्विडचा पुरवठा होत आहे. दरम्यान, मागणी वाढल्यानंतर पुरवठा कमी झाला आहे. दररोज आठ हजार ऑक्सिजन लिक्विड पुरवू शकत नसल्याचे आयनॉक्स कंपनीने रुग्णालय प्रशासनाला कळवले आहे. त्यानुसार बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला साडेचार हजार लीटर ऑक्सिजन लिक्विडचा पुरवठा झाला. सध्या या संस्थेकडे १२ हजार लीटर लिक्विडचा स्टॉक आहे. त्याचा वापर काटकसरीने केल्यास तो दीड ते दोन दिवस पुरू शकतो. जम्बो सिलिंडरच्या पुरवठ्यातही घट झाली आहे. दररोज दोनशे जम्बो सिलिंडरची मागणी होते. परंतु, ५० ते ६० सिलिंडर दिवसाला मिळत आहेत. जम्बो सिलिंडर तीन दिवस पुरतील इतकाच स्टॉक आहे. त्याचाही वापर काटकसरीने करावा लागेल. त्या अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी मेडिसीन विभागाला ऑक्सिजनचा वापर काटकसरीने करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, त्याच रुग्णांना ऑक्सिजन देण्यात यावा, असे सूचित केले आहे. कंपनीकडूनच ऑक्सिजनच्या पुरवठ्यात घट झाली आहे. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. जिल्ह्यातील अन्य शासकीय रुग्णालयांना साडेतीन हजार सिलिंडर लागतात. परंतु, त्यांनाही तुटवड्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कोविडचे गंभीर रुग्ण वाढल्यामुळे ही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

खासगी रुग्णालयांकडूनही मागणी वाढली

लातूर शहरात ३५ ते ३६ कोविड रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे या रुग्णालयांकडूनही विजया आणि नाना गॅस एजन्सीकडे ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढलेली आहे. जेवढी मागणी आहे, तेवढा पुरवठा सध्याच्या घडीला शक्य नाही. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर काटकसरीने करणे, हाच त्यावर पर्याय आहे. दरम्यान, एका खासगी रुग्णालयाला ऑक्सिजन गॅस न मिळाल्याने डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याची घटना घडली.

Web Title: The number of patients increased in the district; No oxygen bed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.