उदगीरात ऑक्सिजन खाटांची संख्या वाढविली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST2021-04-18T04:19:19+5:302021-04-18T04:19:19+5:30
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे. बाधित रुग्णांना ऑक्सिजनयुक्त खाटांसाठी फिरावे लागत ...

उदगीरात ऑक्सिजन खाटांची संख्या वाढविली जाणार
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे. बाधित रुग्णांना ऑक्सिजनयुक्त खाटांसाठी फिरावे लागत आहे. येथील शासकीय रुग्णालय, तसेच कोविड रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात ऑक्सिजनच्या खाटांची कमतरता आहे. कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानंतर बाहेरून ऑक्सिजन द्यावे लागते. त्यासाठी ऑक्सिजनच्या सिलेंडरचा पुरवठा खासगी रुग्णालयाकडे कमी पडत असल्यामुळे काही रुग्ण पुढील उपचारासाठी अन्य ठिकाणी जात आहेत. शासकीय रुग्णालयातही मागील तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या सतत २०० पुढे जात आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने कोविड रुग्णालय, लाॅयन्स हॉस्पिटल व तोंडार पाटी येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. तिथे खाटांची संख्या कमी पडत असल्याने, प्रशासनाच्या वतीने तोंडार पाटी येथे वाढीव ३० खाटा व पशुवैद्यक महाविद्यालयाच्या वसतिगृहातही ऑक्सिजनयुक्त खाटांचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी सांगितले.