ढाब्यावर बसून ओली पार्टी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST2021-04-30T04:24:49+5:302021-04-30T04:24:49+5:30
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. दरम्यान, बुधवारी चाकूर नगर पंचायतीमधील स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता, स्वच्छता निरीक्षक, लिपिक ...

ढाब्यावर बसून ओली पार्टी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना नोटीस
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. दरम्यान, बुधवारी चाकूर नगर पंचायतीमधील स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता, स्वच्छता निरीक्षक, लिपिक आणि स्वच्छता व घनकचऱ्यावर नियंत्रण ठेवणारे शहर प्रमुख हे चौघे शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात फिरून दुकाने, हॉटेल, धाबे आदी बंद करण्यासाठी दंडात्मक कारवाई करीत होते. त्यानंतर ते शहरानजीकच्या एका धाब्यावर जाऊन ओली पार्टी सुरू केली होती. तेव्हा अजय धनेश्वर, लक्ष्मण धोंडगे, खालीद हरणमारे, अजित घंटेवाड यांनी त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण केले. नगर पंचायतीतील या कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली होती.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी मुख्याधिकाऱ्यांना सदरील कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, असे पत्र पाठविले.
दोन दिवसाचा कालावधी...
सदरील घटना निंदनीय आहे. चौकशीनंतर अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल. सदरील चौघा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, दोन दिवसात खुलासा सादर करण्यास बजावले आहे, असे नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे म्हणाले.