७ हजार ५७५ मतदारांना दुबार नावांमुळे नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST2021-03-13T04:35:26+5:302021-03-13T04:35:26+5:30
अहमदपूर : अहमदपूर विधानसभा मतदारसंघात तब्बल ७ हजार ५७५ मतदारांची दुबार नावे आढळून आली आहेत. ती कमी करण्यासाठी संबंधित ...

७ हजार ५७५ मतदारांना दुबार नावांमुळे नोटिसा
अहमदपूर : अहमदपूर विधानसभा मतदारसंघात तब्बल ७ हजार ५७५ मतदारांची दुबार नावे आढळून आली आहेत. ती कमी करण्यासाठी संबंधित मतदारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. सुनावणीस हजर राहून नाव कमी करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे दुबार मतदार शोधण्याची मोहीम निवडणूक विभागाने हाती घेतली आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात तब्बल ९ हजार ९४५ मतदारांची दुबार नावे आढळून आली आहेत. त्यातील ७ हजार ५७५ मतदारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. दुबार नावांमध्ये मृत, कायम स्थलांतरित व फोटो नसलेल्या मतदारांचाही समावेश आहे. त्यांना नोटीस देऊन चार ते पाच दिवसांत सुनावणी घेण्यात येणार आहे. एकाच ठिकाणी नाव ठेवण्यासाठी संबंधित लेखी हमीपत्र घेतले जाणार आहे. त्यानंतर एक नाव कमी करण्यात येणार आहे. जर संबंधित मतदारांनी प्रतिसाद न दिल्यास त्या मतदाराचे मतदानस्तरीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार एक नाव वगळण्यात येणार आहे.
अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील फोटोसह यादीचे काम ९८.८० टक्के झाले आहे. दोन टक्के काम शिल्लक आहे. मतदारसंघात एकूण ३ लाख १८ हजार १४३ मतदार असून, पुरुष मतदारांची संख्या १ लाख ६९ हजार ३३७, तर स्त्री मतदारांची संख्या १ लाख ४८ हजार १०६ आहे. त्यात ४ हजार ६५९ व्यक्तींचे फोटो नाहीत. त्यात शहराची संख्या अधिक असून, अहमदपूर शहरातील २ हजार ५६७ मतदारांचे फोटो अद्याप उपलब्ध झाले नाहीत. ग्रामीण भागातील २ हजार १०२ मतदारांनी आपले फोटो अद्यापपर्यंत निवडणूक विभागाकडे दिले नाहीत. सर्वेक्षण तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार रत्नाकर राठोड, लिपिक नामदेव अर्जुने, संगणक सहायक युनूस शेख हे काम पाहत आहेत.
सुनावणीत दुबार नावे कमी करावीत...
मतदारसंघात काही नावे दुबार आढळली आहेत. त्यातील ७ हजार ५७५ मतदारांना नोटीस पाठविली आहे. सुनावणीच्या वेळेस हजर राहून एका ठिकाणचे नाव वगळण्यासंबंधी लेखी कळवावे. दोन्ही ठिकाणी नाव असणे निवडणूक कायद्यानुसार गुन्हा असून, त्यामुळे मतदारांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. हे टाळण्यासाठी मतदारांनी एक नाव कमी करावे. यासाठी संबंधित तहसील कार्यालयात भेट द्यावी.
- प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी.
शहरी मतदार यादीत चुका...
शहरातील २ हजार २६७ मतदारांचे नाव दुबार आहे. तसेच अनेकांचे फोटो बदललेले आहेत. कायम स्थलांतरित मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे शहरी यादी दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे, असे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले.