निवडणूक खर्च दाखल न करणाऱ्या १५० उमेदवारांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST2021-02-15T04:18:32+5:302021-02-15T04:18:32+5:30
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या २२९ जागांसाठी नामांकनपत्र दाखल करण्याच्या अंतिम तारखेस ५९९ उमेदवारांनी नामांकनअर्ज दाखल केले होते. मात्र, ...

निवडणूक खर्च दाखल न करणाऱ्या १५० उमेदवारांना नोटिसा
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या २२९ जागांसाठी नामांकनपत्र दाखल करण्याच्या अंतिम तारखेस ५९९ उमेदवारांनी नामांकनअर्ज दाखल केले होते. मात्र, छाननीत ५ नामांकनपत्र अवैध ठरले. त्यामुळे ५९४ उमेदवार शिल्लक होते. त्यानंतर नामांकनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११८ उमेदवारांनी माघार घेतली होती. त्यामुळे ४७६ उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. परंतु, ११ गावांतील २७ उमेदवार बिनविरोध निवडले गेल्यामुळे शेवटी ४४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले होते. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीचा दैनंदिन खर्च निवडणूक विभागाच्या खर्च पथकाकडे सादर करावे, असे निर्देश तहसील प्रशासनाच्या वतीने दिले हाेते. त्यानुसार निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्या टप्प्यात सर्वांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे निवडणूक निकाल लागल्यानंतर जवळपास ३०० उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब खर्च पथकाकडे सादर केला आहे. परंतु, अद्यापही १५० उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचा हिशोब दाखल केला नाही. त्यामुळे निवडणूक खर्चाचा हिशोब दाखल न केलेल्या १५० उमेदवारांना दुसऱ्यांदा नोटिसा देण्यात आल्या आहेत.
खर्चासाठी वेळ व रीत आवश्यक...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास निवडणूक आयोगाने वेळ व रीत याचे पालन करून खर्च दाखल करण्यात यावा, म्हणून दैनंदिन खर्चासाठी नमुना नंबर १ आणि निवडणुकीतील एकंदर खर्चासाठी नमुना नंबर २ देण्यात आला आहे. याशिवाय बंधपत्र, हमीपत्र, बँक खाते पुस्तिकाखर्चाच्या पावत्या, व्हाऊचर जोडून खर्च दाखल करणे अपेक्षित आहे.
...तर कारवाई करण्यात येईल
निवडणूक लढवून निवडणुकीचा खर्च निवडणूक विभागाकडे सादर न करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ ब नुसार संबंधित उमेदवारास पुढील पाच वर्षांसाठी निरर्ह करण्यात येईल तसेच निवडणूक आयोग आणि भारतीय दंड संहितेचे कलम १७१ इ नुसार कारवाई करण्यात येईल,असा इशारा १५० उमेदवारांना दुसऱ्यांदा नोटिसाद्वारे देण्यात आला आहे.