गावठाणाबाहेरील घरांना भरावा लागणार अकृषी कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:18 IST2021-03-15T04:18:54+5:302021-03-15T04:18:54+5:30
: गावठाणाबाहेरील सर्व्हे नंबर आणि गट नंबरमध्ये बांधण्यात आलेल्या घरमालकांना आता अकृषी कर भरावा लागणार असून, ...

गावठाणाबाहेरील घरांना भरावा लागणार अकृषी कर
: गावठाणाबाहेरील सर्व्हे नंबर आणि गट नंबरमध्ये बांधण्यात आलेल्या घरमालकांना आता अकृषी कर भरावा लागणार असून, महसूल विभागाकडून तहसील कार्यालयाकडून संबंधित घरमालकांंना नोटीस देण्यात येत आहेत. या मोहिमेद्वारे सर्व्हेनंबरमध्ये बांधलेल्या घरांची चाळीस पट दंडाने वसुली करण्यात येणार आहे.
गावाच्या जवळ असलेल्या सर्व्हे नंबरमध्ये अकृषी परवानगी न घेता बांधलेल्या घरांची आकारणी चाळीस पटाने दंडाची वसुली करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी निलंगा विकास माने यांनी दिले आहेत. तहसीलदार अतुल जटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावा-गावात तलाठ्यामार्फत संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दंड न भरल्यास सातबारा अथवा ग्रामपंचायत आठ -अ वर बोजा चढविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. गत काही वर्षांपासून गावांचा विस्तार वाढला आहे. त्यात भूकंपानंतर गावठाणमध्ये जागा शिल्लक नसल्याने गावांजवळील सर्व्हेनंबरमधील शेतात मोठ्या प्रमाणात घरे बांधण्यात आली आहेत. मात्र, सर्व्हे नंबरमध्ये घरे बांधताना त्याचे एन. ए. करण्यात आलेले नसल्याने, संबंधित शेतकऱ्यांच्या नावावरील सातबारावर क्षेत्र कमी झाले नाही. तर प्लॉट खरेदी करूनही त्या जागांचे एन. ए. न झाल्याने सर्व्हे नंबरमध्ये घरे होऊनही ती जागा आणखीन मूळ मालकांच्या नावांवर आहे.
दरम्यान, महसूल अधिनियमानुसार एन. ए. झालेल्या क्षेत्रात घरे बांधणे आवश्यक आहे. तसे न झाल्याने ती घरे अकृषी कर भरण्यास बांधिल आहेत. असेही तहसीलच्या सुत्रांनी सांगितले. महसूल विभागाकडून गावठाणाबाहेरील
सर्व्हे नंबर आणि गट नंबरमध्ये बांधलेल्या
घरांचे अकृषी कर चाळीस पट दंडाने वसूल करण्यात येणार असून, कोणत्याही परिस्थितीत दंड माफ केला जाणार नसल्याचे निलंगा येथील उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी सांगितले.