उदगीरात दिवाळीत वाढले ध्वनीप्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST2020-12-06T04:20:25+5:302020-12-06T04:20:25+5:30
उदगीर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार ध्वनीची सामान्यतः पातळी ४० ते ६० डेसिबल असावी लागते. परंतु, एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव ...

उदगीरात दिवाळीत वाढले ध्वनीप्रदूषण
उदगीर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार ध्वनीची सामान्यतः पातळी ४० ते ६० डेसिबल असावी लागते. परंतु, एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि दुसरीकडे दिवाळीचा सण, अशा परिस्थितीत उदगीरातील ध्वनीची पातळी ही ६६ ते १२३ डेसीबलपर्यंत पोहोचल्याचे निदर्शनास आले आहे.
यासंदर्भात येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने सर्व्हे करण्यात आला. वास्तविक पाहता भारतात दिवाळी हा सर्वात मोठा सण होय. या सणाची प्रत्येकाला आतुरता असते. कारण, या सणामध्ये उत्साह, नावीन्य व आपुलकीची भावना वाढीस लागते. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. या कालावधीत मनातील अंधकार-अहंकार दिव्याच्या ज्योतीबरोबर जाळून जावा, असे अपेक्षित आहे.
आधुनिक युगामध्ये दिवाळीत परंपरेप्रमाणे वापरण्यात येणारे मातीचे दिवे सोडून मेण व विद्युत दिव्यांचा वापर वाढला. त्याबरोबर रोषणाईला महत्त्व आले. परिणामी, फटाक्यांची आतषबाजीही मोठ्या प्रमाणात वाढली. लोक आपल्या आनंदासाठी फटाक्यांचा अमर्याद वापर करु लागले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तीन दिवसांत हवा प्रदूषण व विशेषतः ध्वनीप्रदूषण वाढते. त्याचा दुष्परिणाम वर्षभर बालकांना व ज्येष्ठांना सहन करावा लागतो. दरम्यान, यंदा येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभागाने उदगीर शहरातील ध्वनी प्रदूषणाची पातळी दिवाळीत मोजली. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.
दिवाळीच्या तीन दिवसांच्या काळात उदगीर शहरातील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उमा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोंढा मार्केट, कॅप्टन चौक, एस. टी. कॉलनी, लोणी म. औ. वि. महामंडळ या भागातील केलेल्या सर्वेक्षणामध्ये पहिल्या दिवशी ध्वनीमर्यादा सर्वात जास्त उमा चौकात ६६ ते ११० डेसिबल तर सर्वात कमी एस. टी. कॉलनीत ६७ ते ७३ डेसिबलपर्यंत होती. दुसऱ्या दिवशी, छत्रपती शिवाजी महाराज चौकात ८९ ते १२३ डेसिबल ध्वनीमर्यादा सर्वात जास्त होती तर सर्वात कमी लोणी म. औ. वि. महामंडळ ७६ ते ८१ डेसिबलपर्यंत होती. तिसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ८९ ते १२३ डेसिबल ध्वनीमर्यादा सर्वात जास्त तर सर्वात कमी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय परिसर ६६ ते ७६ डेसिबल एवढी आढळून आली आहे.
आरोग्यावर परिणाम...
दिवाळीच्या तीन दिवसांत ध्वनीची तीव्रता अतिशय जास्त होती. अशा प्रकारची ध्वनीपातळी वाढणे हे सर्वांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे डोकेदुखी, बहिरेपणा, हृदयावर ताण असा त्रास जाणवतो. गर्भातील शिशुच्या वाढीवरही परिणाम होतो, चिडचिडेपणा वाढीस लागतो व कामावरही परिणाम होतो. त्यामुळे दिवाळी साजरी करताना कमीत कमी फटाके फोडावेत. सामान्यतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार ध्वनीची पातळी ही ४० ते ६० डेसिबल असावी, असे पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी सांगितले.