कोविड सेंटरमध्ये रुग्णांशिवाय इतरांना नो-एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:20 IST2021-03-23T04:20:40+5:302021-03-23T04:20:40+5:30
लातूर : जिल्ह्यात गेल्या मागील पंधरा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने उपाययोजना राबविल्या जात ...

कोविड सेंटरमध्ये रुग्णांशिवाय इतरांना नो-एन्ट्री
लातूर : जिल्ह्यात गेल्या मागील पंधरा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने उपाययोजना राबविल्या जात असून, बंद असलेले कोविड केअर सेंटर पूर्ववत करण्यात येत आहेत. या सेंटरमध्ये रुग्णांशिवाय इतरांनी प्रवेश करू नये, यासाठी केंद्राच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णांशिवाय इतरांना कोविड केअर सेंटरमध्ये नो-एन्ट्री आहे.
जिल्ह्यात जवळपास २० शासकीय तर १६ खासगी दवाखान्यात कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्णसंख्या घटल्याने मोजकेच कोविड केअर सेंटर सुरु होते. तर काही सेंटर बंद करण्यात आले आहेत. मात्र गेल्या १५ दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने बंद असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहेत. शहरातील शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था व पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथे पाहणी केली असता केवळ रुग्णांनाच आणि स्वॅब तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना प्रवेश दिले जात असल्याचे चित्र पहायला मिळाले.
तपासणीसाठी आलेल्यांनाच दिला जातोय प्रवेश...
शहरातील पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन वसतिगृहात रॅपिड अँटिजन चाचणी केंद्र तसेच कोविड केअर सेंटर आहे. या ठिकाणी सकाळपासूनच तपासणीसाठी नागरिकांची गर्दी असते. इतरांना प्रवेश करण्यास मनाई असून, गेटवर सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत. यामध्ये दोन गार्ड तर दोन महिला सुरक्षा कर्मचारी आहेत. चाचणी करतानाही फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्याच्या सूचना केल्या जातात. अहवाल तत्काळ मिळत असल्याने रुग्णांची गैरसोय टळत आहे. सदरील केंद्र महापालिकेच्या वतीने रुग्णसंख्या घटल्याने बंद करण्यात आले होते. मात्र सध्या वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या वतीने रॅपिड अँटिजन चाचणी केंद्र तसेच बंद असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली आहेत.
कोविड केअर सेंटर परिसरात सुरक्षा रक्षकांची पहारेदारी...
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था येथे दररोज हजारो रुग्णांची ये-जा असते. त्यातच कोविड केअर सेंटर याच संस्था परिसरात असल्याने विशेष खबरदारी घेतली जात आहे. स्वॅब तपासणीच्या ठिकाणी सर्वच कर्मचाऱ्यांना पीपीई कीट बंधनकारक करण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांचा खडा पहारा आहे.
जिल्ह्यात सर्वप्रथम याच ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले होते. कोविड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष डाॅक्टरांची नेमणूक केली आहे. इतरांना प्रवेश बंद असून, केवळ रुग्णांनाच कोविड केअर सेंटरमध्ये प्रवेश दिला जात आहे. या ठिकाणी पाहणी केली असता सामान्य रुग्णालयांना कोविड केअर सेंटरच्या जवळपासही फिरू दिले जात नसल्याचे चित्र असून, योग्य खबरदारी घेतली जात आहे.