शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे नवे प्रभारी अधिष्ठाता डॉ. देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:19 IST2021-04-02T04:19:25+5:302021-04-02T04:19:25+5:30
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून औरंगाबादच्या घाटीतील जनऔषधी वैद्यकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. मोहन डोईबळे यांची ...

शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे नवे प्रभारी अधिष्ठाता डॉ. देशमुख
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून औरंगाबादच्या घाटीतील जनऔषधी वैद्यकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. मोहन डोईबळे यांची जुलैमध्ये शासनाने नियुक्ती केली होती. त्यांनी नऊ महिने येथील कार्यभार सांभाळला होता. दरम्यान, डॉ. डोईबळे यांनी वैद्यकीय कारणास्तव प्रभारी अधिष्ठातापदी काम करण्यास असहमती दर्शविल्याने अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार अंबाजोगाईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शल्यचिकित्सा शास्त्र विभागातील प्रा. डॉ. सुधीर देशमुख यांच्यावर सोपविण्यात येत असल्याचे आदेश राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी बुधवारी काढले.
नूतन प्रभारी अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचा महाराष्ट्र राज्य वैद्यकीय संघटना लातूरच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. डोईबळे यांना निरोप देण्यात आला. यावेळी एमएसएमटीएचे राज्याध्यक्ष डॉ. उदय मोहिते, लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे, डॉ. गणेश पवार, डॉ. मंगेश सेलूकर, डॉ. उमेश लाड, डॉ. सुषमा जाधव, डॉ. अनिल मुंडे, डॉ. अजय ओव्हळ, डॉ. शैलेंद्र चव्हाण, डॉ. जमदाडे, डॉ. नरेंद्र पाटील, आदींची उपस्थिती होती. दरम्यान, डॉ. देशमुख यांनी संस्थेतील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला.
दर्जेदार आरोग्य सेवेवर भर...
कोरोनाचे जागतिक संकट आले आहे. या कालावधीत काेरोनाबाधित रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर आपले सर्वाधिक लक्ष राहणार आहे. कुठल्याही रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे नूतन अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी सांगितले.
डॉ. देशमुख हे अंबाजोगाईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी असून, तिथेच ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तद्नंतर नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आठ महिने अधिष्ठाता म्हणून काम केले आहे.
कॅप्शन : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे नूतन प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचा एमएसएमटीएच्या वतीने गुरुवारी सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. उदय मोहिते, डॉ. उमेश कानडे, डॉ. गणेश पवार, डॉ. मंगेश सेलूकर, डॉ. अजय ओव्हळ, डॉ. शैलेंद्र चव्हाण.