राष्ट्रवादी कामगार सेलची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:19 IST2021-02-13T04:19:20+5:302021-02-13T04:19:20+5:30
रंगनाथ बदने यांची जिल्हाध्यक्षपदी निवड लातूर : कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य लातूर विभागाअंतर्गत लातूर जिल्हा कार्यकारिणीची निवड ...

राष्ट्रवादी कामगार सेलची कार्यकारिणी जाहीर
रंगनाथ बदने यांची जिल्हाध्यक्षपदी निवड
लातूर : कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य लातूर विभागाअंतर्गत लातूर जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. रंगनाथ बदने यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. रमाकांत जाधव यांची निवड झाली. या निवडीबद्दल कार्याध्यक्ष प्रा. सुनील शिंदे यांच्यासह परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
ग्रामीण भागात बस सुरू करावी
लातूर : शासनाच्या निर्देशानुसार ५ वी ते १२ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. अनेक भागांत एस.टी. बससेवा पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती पूर्वपदावर आली असून, लातूर विभागाने बंद असलेल्या बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून होत आहे.
रस्त्यावरील बांधकाम साहित्यामुळे गैरसोय
लातूर : शहरातील काही भागांत रस्त्यावर बांधकामाचे साहित्य टाकण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर साहित्य असल्याने चारचाकी वाहनालाही वाट मिळत नसल्याची स्थिती आहे. ज्या भागातील रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकण्यात आले आहे. त्या ठिकाणी मनपाच्या वतीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्यावरील नालीमुळे वाहनधारक त्रस्त
लातूर : शहरातील रेल्वे लाईनच्या समांतर रोडवर काही ठिकाणी नालीचे खोदकाम करण्यात आले असून, दुचाकी चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याची टाकी ते पाच नंबर चौक या समांतर रस्त्यावर ही स्थिती आहे. तर आवंती नगर रोडवर डांबरीकरण करण्यात आले असले तरी रस्त्यावर खडी तशीच आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप अनेक नागरिकांमधून होत आहे.
प्रशिक्षण शिबिरात सहभाग नोंदवावा
लातूर : दिव्यांग आणि वयोवृद्ध व्यक्तींचे आयुष्य आनंदी कसे राहील, यासाठी सावली प्रशिक्षण संस्था, सीएफएआर, हेल्लेज इंडिया, फेस्कॉम व एएससीओपी या संस्थांच्या वतीने चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांनी केले आहे. या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या कायद्यांची व योजनांची माहिती दिली जाणार आहे.
ओळखपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करावी
लातूर : जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र देण्यासाठी शासन संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी शासनाच्या संकेतस्थळाला भेट देऊन ओळखपत्र काढण्यासाठी नोंदणी करावी. नोंदणी करण्यास अडचण आल्यास समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण विभाग सहायक आयुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी
लातूर : लातूर शहरातील अखिल भारतीय युवा मित्र मंडळाच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सिरसाठे, गौतमकुमार कांबळे, प्रदीप कांबळे, विशाल कांबळे, आनंद लातूरकर, संजय घुगे, मिलिंद बानाटे, दीपक साबणे, व्यंकट सानप, सतीश भोसले, अनंत कदम, विवेक सौतोडकर, यांची उपस्थिती होती.
नाना-नानी पार्क परिसर खुला करावा
लातूर : शहरातील नाना-नानी पार्क परिसरात सकाळी मॉर्निंगसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सकाळी ५ ते १० वाजेपर्यंत कसलीही अडचण न येता सदरील पार्क खुला ठेवावा, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. यावेळी ॲड. अजय कलशेट्टी, शहराध्यक्ष मनोज अभंगे, ॲड. शिवकुमार बनसोडे, नंदा हामिणे, साक्षी ईटकर, विजयादेवी बिडवे, ॲड. सुरेश सलगरे, बालाजी पाटील, रणवीर उमाटे, अनिल जाधव, जहांगीर शेख, सिद्धेश्वर स्वामी, गोपाळ खंडागळे आदींची उपस्थिती होती.
प्रीती जल्हारे हिचे विद्यापीठ परीक्षेत यश
लातूर : केशरबाई काळे गर्ल्स बीसीए महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रीती जल्हारे हिने एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये यश मिळविले आहे. या यशाबद्दल प्राचार्य दीपक खंदारे, प्रा. सतीश कांबळे, प्रवीण कांबळे, तनुजा देपे, प्रियंका संकाये, प्रियंका तीर्थे, देवकन्या हिंगमिरे, दृष्टी सुतारिया, विद्या सोनवणे आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापकांनी कौतुक केले आहे.
क्षयरुग्णांची नोंद करणे बंधनकारक
लातूर : खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, पॅथॉलॉजी लॅब, रेडिओलॉजिस्ट व औषध विक्रेते यांना त्यांच्याकडे निदान झालेल्या क्षयरुग्णांची नोंद शासनाकडे करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी शिवाजी फुलारी यांनी कळविले आहे. निदान झालेल्या क्षयरुग्णांची नोंद न झाल्यास विविध कलमानुसार कार्यवाही होऊ शकते. लातूर शहर आणि जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी निदान झालेल्या सर्व क्षयरुग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग विभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.