वाय- फाय सुविधेने नागतीर्थवाडी झाले हायटेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST2021-08-29T04:21:11+5:302021-08-29T04:21:11+5:30

लातूर : कोविडमुळे ऑनलाईनला महत्त्व आले आहे. परंतु, बहुतांश जणांना पैशाअभावी इंटरनेट सुविधा घेणे कठीण झाल्याचे पाहून नागतीर्थवाडी (ता. ...

Nagtirthwadi becomes high-tech with Wi-Fi facility! | वाय- फाय सुविधेने नागतीर्थवाडी झाले हायटेक !

वाय- फाय सुविधेने नागतीर्थवाडी झाले हायटेक !

लातूर : कोविडमुळे ऑनलाईनला महत्त्व आले आहे. परंतु, बहुतांश जणांना पैशाअभावी इंटरनेट सुविधा घेणे कठीण झाल्याचे पाहून नागतीर्थवाडी (ता. देवणी) ने संपूर्ण गावातच मोफत वाय-फाय सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळण्यास मदत तर झालीच आहे याशिवाय, गावातील शेतकरी ऑनलाईन बाजारभाव पाहत असून महिला बचत गटाच्या बैठकाही ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे संपूर्ण गाव हायटेक झाले आहे.

देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी हे ११० उंबरठ्यांचे आणि ६७४ लोकसंख्येचे गाव आहे. गावात जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीपर्यंतची शाळा आहे. सीमावर्ती भागात गाव असल्याने गावातील बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती जेमतेम असली तरी ग्रामपंचायतीचा गावकऱ्यांच्या सहकार्याने गावात नवनवीन उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. लोकसहभागातून वृक्ष लागवड केली असून बाल उपक्रमासाठी सव्वा लाखाची गावकऱ्यांनी मदत दिली आहे.

कोविडमुळे ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. अशा परिस्थितीत काही पालकांना आपल्या मुलांच्या मोबाईलसाठी इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देणे शक्य होईना. याशिवाय, सतत इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन सेवेत व्यत्यय येऊ लागला. त्यामुळे ग्रामपंचायतीने ३० हजार खर्चून गावात ६ ठिकाणे निश्चित करुन मोफत वाय-फाय सुविधा सुरू केली. त्यामुळे गावातील मुलांसोबत शेतकरी, महिलाही ऑनलाईन झाल्या आहेत.

जिल्ह्यातील पहिले अग्रेसर गाव...

गावास यापूर्वी संत गाडगेबाबा महाराज ग्रामस्वच्छता अभियानात एक लाखाचे, वॉटर कप स्पर्धेत ५ लाखाचा पुरस्कार मिळाला आहे. निर्मल ग्राममध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झाला आहे. गावाने पर्यावरणाचे संतुलन राखण्याबरोबर ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे म्हणून चार एकर गायरान जागेत ३०० चिंचेच्या झाडांची लागवड केली आहे. जिल्ह्यातील पहिले वाय-फाय सुविधेचे गाव झाले आहे.

स्वयंपाक करणाऱ्या महिलेला ग्रामसभेची माहिती...

गावातील नागरिकांना कुठलीही माहिती देण्यासाठी संपूर्ण गावात ध्वनिक्षेपकाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. त्याद्वारे सूचना, माहिती दिली जात आहे. एवढेच नव्हे तर ग्रामसभेतील चर्चेची माहितीही स्वयंपाक करणाऱ्या महिलेला सहजरीत्या मिळत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीची पेपरलेसकडे वाटचाल सुरू आहे.

स्मार्ट व्हिलेजसाठी प्रयत्न...

गावातील प्रत्येकाला देशभरातील माहिती मिळावी. तसेच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु रहावे. ग्रामपंचायतीबरोबर अंगणवाडी, शाळा, रेशन दुकानाला

येणाऱ्यांची कुठलीही अडचण होऊ नये म्हणून ही सुविधा उपलब्ध केली आहे.

- राज गुणाले, सरपंच.

डिजिटल युगात गरज...

सध्याचे डिजिटल युग आहे. त्यात गावातील कोणीही मागे राहू नये म्हणून ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचा चांगला फायदा होत आहे.

गावकऱ्यांचेही सहकार्य मिळते.

- श्रीकांत पताळे, ग्रामसेवक.

Web Title: Nagtirthwadi becomes high-tech with Wi-Fi facility!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.