नगरपंचायतीत १७ पैकी १० कर्मचारी अनुपस्थित, संघर्ष समितीचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:23 IST2021-08-28T04:23:59+5:302021-08-28T04:23:59+5:30

तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे. बायोमेट्रिक मशीन, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी चाकूर संघर्ष समितीच्यावतीने सातत्याने ...

In Nagar Panchayat, 10 out of 17 employees are absent | नगरपंचायतीत १७ पैकी १० कर्मचारी अनुपस्थित, संघर्ष समितीचा ठिय्या

नगरपंचायतीत १७ पैकी १० कर्मचारी अनुपस्थित, संघर्ष समितीचा ठिय्या

तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे. बायोमेट्रिक मशीन, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी चाकूर संघर्ष समितीच्यावतीने सातत्याने करण्यात येत आहे. त्याची दखल घेत तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी सर्व कार्यालयीन प्रमुखांची बैठक घेऊन मुख्यालयी राहण्याचे दोनदा आदेश दिले तसेच बायोमेट्रिक मशीन, सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना केल्या; परंतु, या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

संघर्ष समितीचे सुधाकरराव लोहारे, अजय धनेश्वर, विश्वनाथ कांबळे, अ. ना. शिंदे, सतीश गाडेकर, मंगेश स्वामी, गोविंद घोडगे, अभिषेश सूर्यवंशी, अभिजित कामजळगे, योगेश पाटील, वीरभद्र स्वामी, सागर होळदांडगे, निखिल येरनाळे आदी पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी ९.५५ वा. नगरपंचायत कार्यालयात थांबून ठिय्या मांडला. सकाळी १०.३५ वा. १७ पैकी ७ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. १० जण गैरहजर होते. त्यामुळे तहसीलदारांना माहिती दिली. तहसीलदार डॉ. बिडवे यांनी तलाठी बालाजी हाके यांना पाठवून नगरपंचायतीतील परिस्थितीचा पंचनामा केला. तलाठी हाके यांनी गैरहजर असल्याचे कारण विचारले असता कोणीही उत्तर दिले नाही.

हजेरी पुस्तिकेत कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत...

हजेरी पुस्तिकेत काही दिवसांपासून काही कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत. हालचाल रजिस्टरवर नोंदी नाहीत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना निलंबित करावे. नगरपंचायत ही शहराच्या विकासाचे कार्यालय आहे. कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने जनतेची कामे वेळेवर होत नाहीत. तालुक्यातील ९० टक्के अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. उशीरला येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करावे. मुख्यालयी न राहणाऱ्यांवर तहसीलदारांनी कार्यवाही करावी.

- सुधाकरराव लोहारे, चाकूर संघर्ष समिती.

जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव...

चाकूर नगरपंचायतीमधील काही कर्मचारी गैरहजर होते. त्याचा पंचनामा केला आहे. त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.

- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.

नोटिसा बजावण्यात येतील...

नगरपंचायतीत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटिसा’ बजावल्या जाणार आहेत. समाधानकारक खुलासा न आल्यास निश्चित कार्यवाही केली जाईल. हजेरी पुस्तिकेत स्वाक्षरी नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटिसा देऊन खुलासा मागविण्यात येईल.

- अजिंक्य रणदिवे, मुख्याधिकारी, नगरपंचायत.

Web Title: In Nagar Panchayat, 10 out of 17 employees are absent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.